मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर ते पनवेल टप्प्यातील दहा नद्या आणि कालव्यांवर ५० ते १०० वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांचा धोका पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०११ पासून या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले असले तरीही ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरून आजही वाहतूक सुरूच आहे. दहा पुलांपैकी आठ पूल हे सिमेंट बांधकामातील तर दोन पूल हे दगडी बांधकामातील आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर नदी आणि कालव्यांवर ३६ लहानमोठे पूल आहेत. पुलांचे बांधकाम ब्रिटिशकालीन असल्याने त्यांची पडझड होण्याची शक्यता व्यक्त करून दुरुस्तीच्या सूचना सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ातील बांधकाम विभागांना देण्यात आल्या होत्या; परंतु याबाबत कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांना विचारले असता असे कोणतेही पत्र ब्रिटिश सरकारने दिल्याची माहिती आजवर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलादपूर ते खारपाडा या टप्प्यात मागील चार वर्षांत १३०१ अपघातांत २५६ जणांचा मृत्यू, १९९५ जबर जखमी झाले आहेत. या अपघातांना जबाबदार असलेल्या पैलूकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
पोलादपूर ते इंदापूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत आहे. येथे महाडमधील गांधारी नदीवरून जाणारा पूल, माणगाव येथील पूल हे धोकादायक आहेत. इंदापूर ते पळस्पे या परिसरात एकूण सहा पूल आहेत. बाळगंगा, खारपाडा, भोगेश्वरी, अंबानदी, कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांवर हे पूल ६० वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. या पुलांची पडझड होत असताना महामार्गाचे रुंदीकरण करण्याच्या नावाखाली पुलाची काही अंशी मलमपट्टी करून या पुलावरून आजही वाहतूक सुरू आहे. पनवेल येथील काळुंद्रे आणि गाडी नदीवरील पुलांना शंभर वर्षे उलटली आहेत. हे पूल धोकादायक असले तरीही प्रशासन आणि राज्यकर्ते यावर गंभीर नाहीत. कळंबोली ते पळस्पे हा महामार्ग एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या महामार्गावरील हे दोन पूल नव्याने बांधून त्याचे रुंदीकरण करण्याचे काम मागील तीन वर्षांपासून सरकारच्या धोरणात आहे. आघाडीच्या सरकारने हे दोन पूल बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती; मात्र युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी आघाडी सरकारने घेतलेले मागील सहा महिन्यांतील निर्णय रद्द केले आणि त्यातच पनवेलमधील या दोन पुलांचे भवितव्य अडकून राहिले. या विभागातील अधिकाऱ्यांनी ११ ऑगस्ट रोजी या कामाची निविदा निघणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र महाडच्या दुर्घटनेनंतरही सरकार या कोकणातील दहा पुलांकडे संवेदनशीलपणे पाहते का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मुंबई-गोवा महामार्गातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण मे महिन्यात राष्ट्रीय महामार्ग विभागातील तज्ज्ञ अभियंत्यांनी केले होते तसा अहवालही त्यांनी संबंधित विभागाच्या उच्चपदस्थांकडे सोपविला होता.
सर्वेक्षणात सुरक्षित पुलांच्या यादीमध्ये सावित्री नदीवरील मंगळवारची दुर्घटना घडलेल्या पुलाचा समावेश होता. मात्र तरीही ही घटना घडल्याने या पुलाच्या सर्वेक्षणाच्या अहवालाविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कोकण आयुक्त देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील सर्व पुलांचे नव्याने सर्वेक्षण इतर बांधकाम तज्ज्ञ अभियंत्यांकडून लवकरच करण्यात येईल अशी माहिती या घटनेनंतर देशमुख यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
धोकादायक पुलांची नावे
महाड येथील गांधारी नदीवरील, माणगाव, भोगेश्वरी, अंबानदी, कुंडलिका तसेच पनवेलमधील काळुंद्रे, गाडी नदीवरील पूल.
पथदिव्यांचीही सोय नाही
नदीवरील पुलांवर पथदिवे नाहीत. विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाच्या नियोजनानुसार या महामार्गात पथदिव्यांची सोय फक्त टोल प्लाझांवर केलेली आहे. खारपाडा व सुकेळी येथे टोल प्लाझा उभारला जाणार आहे. किमान नदी व कालव्यांवरील पुलांवर, गावाजवळ पथदिव्यांची सोय असावी अशी मागणी मंगळवारच्या घटनेनंतर होत आहे.
‘सुस्थितीतील’ आणखी १४ पूल
रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील १४ पूल सुमारे ब्रिटिश काळातील आहेत. या सर्व पुलांच्या बांधकामांचे स्थापत्य महाडच्या अपघातग्रस्त पुलासारखेच दगडी कमानींचे आहे. यापैकी काही पुलांवरून अवजड वाहने जात असताना पादचाऱ्यांना चक्क हादरे जाणवतात. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी महाड पुलाप्रमाणेच हे सर्व पूल ‘सुस्थितीत’ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
या पुलांची नावे पुढीलप्रमाणे-
बाव नदीवरील पूल (सन १९२५, ता. संगमेश्वर), काजळी नदीवरील अंजणारी पूल (सन १९३१, ता. लांजा), मुचकुंदी नदीवरील वाकेड पूल (सन १९३१, ता. लांजा), जगबुडी नदीवरील पूल (सन १९३१, ता. खेड), गड नदीवरील आरवली पूल (सन १९३२, ता. संगमेश्वर), जानवली नदीवरील पूल (सन १९३४), शास्त्री नदीवरील पूल व सोनवी नदीवरील पूल (सन १९३९, ता. संगमेश्वर), वाशिष्ठी नदीवरील वाशिष्ठी पूल (सन १९४३, ता. चिपळूण), गड नदीवरील पूल (सन १९३४, ता. संगमेश्वर), कसाल नदीवरील पूल (सन १९३४, ता. कुडाळ), वेताळ नदीवरील बांबर्डे पूल (सन १९३८), पियाली नदीवरील पूल (सन १९४१), अर्जुना नदीवरील पूल
(सन १९४४, ता. राजापूर)