लोकसत्ता,प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई: स्वच्छतेसह इतर अनेक मानांकने मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला मात्र ग्रहण लागले आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात अग्निशमन सेवा पुरवणाऱ्या अग्निशमन दलात अग्निशमन पदावर कार्यरत असणाऱ्या सुमारे २०० अग्निशमन जवानांपैकी २३ जवानांकडे आगीवर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन बाबत असलेल्या ट्रेनिंगची प्रमाणपत्रेच नाहीत .

महाराष्ट्रात सर्व महापालिका, एमआयडीसी, सिडको, व खाजगी व्यवस्थापनामध्ये अग्निशामक पदावर नियुक्ती करताना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रामार्फत चालवले जाणारे ट्रेनिंग घेणे अनिवार्य आहे व हे प्रशिक्षण असल्याशिवाय नियुक्ती करता येत नाही. आवाज फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा मौर्य यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून नवी मुंबई अग्निशमन दलात सुमारे २३कर्मचारी हे कोणतेही अधिकृत ट्रेनिंग न घेता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे पालिकेत कार्यरत आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई: विधानसभेवर नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, रायगडमधील शेतकरीही सहभाग होणार

कोणतेही ट्रेनिंग नसलेले अग्निशामक किरण अटकरी यांना तर पालिकेने पुढील पदोन्नतीसाठी ट्रेनिंगला देखील पाठवले आहे. महापालिकेत रुजू होण्यापूर्वी जड वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील मधुकर गोळे यांना सेवेत रुजू करून त्यांनाही पुढील पदोन्नतीसाठी पालिकेने सुमारे पाच लाख खर्च करून ट्रेनिंग दिले आज मीतीस नवी मुंबईच्या करदात्यांची अग्निसुरक्षा महापालिकेने वेशीवर टांगली असूननियमानुसार अधिकृत प्रमाणपत्र नसलेले २३ अग्निशामक जवान आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई : MIDC डोंगर परिसरातील मोठ्या प्रमाणात वन संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी, संशयाचा धूर…

या सर्व अग्निशमन जवानांवर येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास तात्काळ नवी मुंबईतील करदात्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अग्निशमन दल व नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती सुषमा मौर्य यांनी नेरूळ पत्रकार परिषदेत दिली आहे.

यापूर्वी पालिकेने २ पेक्षा अधिक अपत्ये असलेल्या २ जवानांना बडतर्फ केले होते. त्यामुळे आता २३ कर्माचाऱ्याबाबत पालिका काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten percent of firefighters are bogus in navi mumbai fire brigade mrj