नवी मुंबई : बऱ्याच वर्षांच्या विलंबानंतर पामबीच मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या घणसोली ते ऐरोली प्रकल्प आता दृष्टीक्षेपात आला असून या प्रकल्पाची निविदा प्रसिध्द झाली असून सोमवारी या प्रकल्पाच्या तांत्रिक निविदा उघडण्यात आली आहे. जवळजवळ ५४० कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी येणार असून त्यासाठी सिडको २७० कोटी देणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त केल्या आहेत आणि ऐरोली-मुलुंड खाडी पुलापर्यंत रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित आराखड्यामुळे रस्त्याची लांबी ३.४७ किमीने वाढणार आहे. तसेच याच मार्गावर १.९५ किमीचा उड्डाणपूलही होणार आहे.
हेही वाचा >>>‘त्या’ तरुणीचा मृतदेह खारघरच्या निर्जनस्थळी सापडला
सिडकोने बेलापूर ते ऐरोली सेक्टर १० ए पर्यंत २१.१२ कि.मी. लांबीचा पामबीच रोड प्रकल्प प्रस्तावित केला होता. बेलापूर ते घणसोली हा १९.२० कि.मी.चा रस्ता सिडकोने बांधला होता, परंतु उर्वरित दोन किलोमीटरचे काम खारफुटीच्या क्षेत्राचा समावेश असल्याने रखडले होते. २००९ मध्ये सिडकोने अपूर्ण पामबीच रोड प्रकल्पासह घणसोली नोड महापालिकेकडे हस्तांतरित केला होता. नवी मुंबई महापालिकेने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी, वन विभाग, खारफुटी संवर्धन समिती, पर्यावरण संबंधित प्राधिकरणांकडून परवानग्या मिळवल्या आहेत.
केवळ मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी प्रलंबित असून पालिकेने यापूर्वीच कार्यवाही केली आहे. उर्वरित पामबीच विस्तारीकरणात रस्त्याचे बांधकाम ३.४७ कि.मी.चे असून उड्डाणपूल हा १.९७ कि.मी.चा असल्याची माहिती या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली.
हेही वाचा >>>पनवेल : मालमत्ताधारकांच्या माथी १३६ कोटींचा दंड, चालू आर्थिक वर्षात ३६ कोटी जमा
वेगवान दळणवळण
घणसोली-ऐरोली पामबीच रोड प्रकल्पामुळे वाहतुकीची चांगली सुविधा होणार असून ऐरोली-मुलुंड पूल आणि ऐरोली-काटई मार्गाला जोडला जाईल. त्यामुळे कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड भागांत वेगाने प्रवास करता येईल.
पामबीच मार्गाच्या विस्तारीकरणामुळे घणसोली-ऐरोली खाडीपूल मार्गामुळे वाहतुकीसाठी चांगली सुविधा निर्माण होणार आहे. सिडकोने यासाठी ५० टक्के म्हणजेच २७० कोटी खर्च देण्याचे मान्य केले आहे.- राजेश नार्वेकर, आयुक्त, नमुंमपा