नवी मुंबई : दिड महिन्यापासून वेतन नाही, पगारी रजा नाही आणि त्यात पाच वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी भरला नाही. ही व्यथा आहे नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कामगारांची. याचाच विरोधात इंटक संघटनेने मोर्चा आंदोलन केले असून सोमवार पर्यंत या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
तेरणा रुग्णालयात सफाई व अन्य कामांसाठी गोल्डन हॉस्पिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला कंत्राट दिलेले आहे. या कंपनीकडून कार्यरत कर्मचाऱ्यांना मागील दीड महिन्यापासून वेतन दिलेले नाही. कंपनीने या कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागील ५ वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी भरण्यात आला नाही. हक्काची भर पगारी रजाही दिल्या जात नसल्याने कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पगारी रजाही शिल्लक आहे. कर्मचारी रुग्णालयाचेच काम मागील अनेक वर्षांपासून करत असूनही या कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या बाबत राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आंदोलन केले गेले. या वेळी समंधीत कंत्राटदार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
थकीत भविष्य निर्वाह निधी भरणा, थकीत वेतन व पगारी रजांचे पैसे रुग्णालय व्यवस्थापणाकडून मिळावे अशा मुख्य मागण्या करण्यात आल्या. रवींद्र सावंत (इंटक अध्यक्ष-नवी मुंबई) रुग्णालयात चतुर्थ श्रेणी घटक सर्वात महत्वाचा घटक असून त्याच्या भविष्याशी खेळले जात आहे. या बाबत रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा झाली त्यात सोमवारपर्यंत समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. हे आश्वासन पाळण्याचे आले नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल.