लोकसत्ता टीम
पनवेल: चोर चालत आला. त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली अन् कोणतीच भिती न बाळगता स्वतःच्या दुचाकीपर्यंत चालत गेला. काही क्षणात महिलेला काही समजण्याआत तो उभ्या केलेल्या दुचाकीवरुन फरार झाला. या चोरीत चोरट्याने महिलेचे एक लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविले. ही घटना सोमवारी साडेसात वाजता खारघरमधील सेक्टर २१ येथील सेंट्रल पार्कजवळच्या रस्त्यावर घडली.
खारघरमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत वाढली असे बोलण्याची वेळ आली आहे. याच खारघर पोलीसांनी जिवाची बाजी लावून अंमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरीयन नागरिकांना जेरबंद केले होते. याच खारघरमध्ये रस्त्यावर पायी चालणाऱ्यांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेबाबत रितसर खारघर पोलीस ठाण्यात अनोळखी चोराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
आणखी वाचा-बोकडवीरा-शेवा उड्डाणपूलावर दिवसाही दिवे सुरूच
खारघर वसाहतीमधील सेक्टर २० येथील कस्तुरीव्हीला सोसायटीत राहणाऱ्या ४० वर्षीय महिला सेक्टर २१ येथील युवराज बंगलोच्या समोरील रस्त्यावर चालत असताना काळ्या रंगाचा शर्ट, पॅन्ट आणि काळी मुखपट्टी लावून आलेल्या ३५ वर्षीय चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. या चोरट्याच्या डोक्यात हेल्मेट असल्याने त्याचा चेहरा महिलेला दिसला नाही. खारघरमध्ये पोलीसांचा वचक कमी झाल्याने चोरट्याने चालत महिलेच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचून काही अंतरावर उभ्या केलेल्या दुचाकीवरुन तो पळून गेला. या घटनेमुळे पोलीसांची रात्रगस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडू होत आहे.