एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलीस आरोपीला अटक करून घेऊन जाताना, स्थानिक पोलिसांना कळवले नाही तर स्थानिक पोलिसांना कसा मनस्ताप होतो. विनाकारण कितीतरी तास तपासात कसे वाया जातात, याचा अनुभव नवी मुंबई पोलिसांना आला आहे . एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केल्यावर त्याची तत्काळ शोधाशोध सुरु झाली मात्र त्याचे अपहरण झाले नसून फसवणूक गुन्ह्यासाठी ग्वाल्हेर पोलिसांनी त्याला अटक करून घेऊन गेल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी निश्वास सोडला मात्र त्यामुळे हकनाक १२ तासांची धावपळ व्यर्थ ठरली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 विले पार्ले येथे राहणारे व्यापारी असलेले व्यापारी वीरेंद्र गुप्ता हे  एपीएमसी भागात आले होते, ते याच भागात अन्यत्र जाण्यासाठी रिक्षात बसले मात्र काही अंतर गेल्यावर एका इनोव्हा गाडीतून काही लोक उतरले व त्यांना पकडून घेऊन गेले. या घटनेने रिक्षा चालक हादरला होता . त्याने याची माहिती कोणालाच दिली नाही मात्र हे प्रकरण आज ना उद्या उघडकीस येईल तेव्हा आपल्यावरही कारवाई होऊ शकते या भीतीने त्यांने थेट एपीएमसी पोलीस ठाणे गाठून प्रवाशाचे अपहरण झाले म्हणून गुन्हा नोंद केला.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखाली पथके नेमली आणि तपास सुरु करण्यात आला. व्यापाऱ्यांचा घराचा पत्ता शोधून काढल्यावर त्यांच्या घरीही पथक धडकले आणि त्यांनाही गुन्हा नोंद करण्यास सांगण्यात आले. मात्र दुसरा दिवस उजाडला तरी गुन्हा नोंद करण्यास कोणीच उत्सुक नसल्याचे समोर आल्यावर एपीएमसी पोलिसांनाही काही तरी वेगळाच प्रकार असल्याचा संशय आला. त्यामुळे कुटुंबीयांची चौकशी केल्यावर वीरेंद्र याला ग्वाल्हेर पोलिसांनी अटक करून घेऊन गेल्याचे समोर आले. 

एपीएमसी मध्ये वीरेंद्र यांच्या परिचित व्यक्तीचे दुकान आहे, त्याच दुकानात रिक्षा चालक नितीन चिकने यांचा एक नातेवाईक काम करतो. त्यामुळे नितीन यांना  वीरेंद्र यांचे नाव माहिती होते.  दरम्यान  नितीन यांनी  ऐरोलीचे भाडे करून येत  पुन्हा दुकानात जाऊन वीरेंद्र घरी पोहचले का याची शहानिशा केली. मात्र वीरेंद्र घरी पोहचले नव्हते हे समजल्यावर त्यांची खात्री झाली की पोलीस असल्याचे सांगून तिसऱ्यानेच त्यांचे अपहरण केले आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंद केला. वीरेंद्र हा एक महिन्यापूर्वीच मुंबईत राहण्यास आला आहे या पूर्वी कलकत्ता येथे राहण्यास होता. त्याच्या विरोधात ग्वाल्हेर येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद होता, त्याच गुन्ह्यात ग्वाल्हेर पोलीस त्याला घेऊन गेले.

विवेक पानसरे (पोलीस उपायुक्त) आरोपीला कुठूनही अटक केले जाऊ शकते मात्र अटक केल्यावर स्थानिक पोलिसांना कळवणे आवश्यक आहे, ते ग्वाल्हेर पोलिसांनी न केल्याने सुमारे १२ तास त्याचा शोध पोलीस घेत होतेच. शिवाय सीसीटीव्ही शोधणाऱ्या सायबर टीमचाही वेळ गेला. सदर गुन्हा रद्द करण्यात येणार आहे.