नवी मुंबई: नवी मुंबईत जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होत असून रिक्षात विसरलेल्या वस्तूही मिळून येत आहेत. काही दिवसापूर्वी वाशी वाहतूक पोलिसांनी रिक्षात विसरलेले महागडे सामान मुळ मालकास परत मिळवून दिले होते. आता अशाच पद्धतीने विसरलेला दिड लाखांचा कॅमेरा व अन्य साहित्य परत मिळवून देण्यात यश आले आहे. या प्रकरणात सीसीटीव्हीने महत्वाची भूमिका बजावली आहे.
ज्युड वर्गीस थॉमस विठायाशील, यांची सोनी अ-७ एम३ डिएसएलआर व्हिडीओ कॅमेरा किट किंमत दिड लाख असलेली बॅग रिक्षामध्ये गहाळ झाली झाली होती. याबाबत त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ज्युड वर्गीस थॉमस विठायाशील हे कोकण भवन ऑटो स्टॅण्ड, सीबीडी बेलापूर ते अक्षर चौक, पाल्म बीच रोड, सीवुड्स असा रिक्षात प्रवास करताना सीवुड्स येथे पोहोचले आणि रिक्षातून असता त्यांच्याकडील एक व्हिडीओ कॅमेरा किट असलेली बॅग सदर रिक्षामध्ये विसरून राहून गेली होती.
हेही वाचा… एपीएमसीत राज्यातील नवीन बटाटा दाखल होण्यास सुरुवात
पोलिसांनी तात्काळ रिक्षाचा शोध घेतला मात्र रिक्षा मिळून न आल्याने सीसीटीव्हीची पाहणी सुरु केली. मात्र जोरदार पावसाने चित्र अस्पष्ट दिसत असल्याने रिक्षा त्याचा क्रमांक दिसत नव्हता. एक वेळ अशी आली कि फिर्यादी आणि तपासणी करणारे कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज मधून काही मिळेल हि आशा सोडली होती. मात्र सीसीटीव्ही कमांड सेंटर येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार सचिन एकनाथ कडू आणि पोलीस शिपाई अंकुश गडगे यांनी सीसीटीव्ही मधून अंदाजे दिसत असलेल्या अस्पष्ट रिक्षा नंबरवरून मिळतेजुळते दोन क्रमांक शोधून काढले. क्रमांकावरून रिक्षा मालकांचा शोध घेतला.
हेही वाचा… पनवेलमध्ये ४८ दिवसांत डेंग्यूचे १४८ तर मलेरियाचे ७९ रुग्ण
सदर रिक्षा चालकाचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांचे मालकांना फोन केले तेव्हा त्यातील एक ऑटो रिक्षा क्रमांक एम एच ४३ बीआर ५३८४ चे मालक यांचेशी सखोल विचारपूस केली असता फिर्यादी यांची गहाळ झालेली व्हिडीओ कॅमेरा किट असलेली बॅग आपल्याच रिक्षात विसरली असल्याची माहिती रिक्षाचे मालक सुरेश राणे यांनी सांगितले. त्यामुळे फिर्यादी ज्यूड वर्गीस थॉमस विठायाशील यांची सदर रिक्षामध्ये राहून गेलेल्या बॅगेमधील सर्व साहित्य मिळून आले. कायदेशीर सोपस्कार पार पाडून हे सर्व सामान ज्यूड वर्गीस थॉमस विठायाशील यांना देण्यात आले. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली.