मुख्यमंत्री आले, त्यांनी दिबाच्या तसबीरीचे दर्शन घेतले, स्वताच त्या तसबीरीला फुलांचा हार घातला आणि कुटूंबातील सदस्यांची भेट घेऊन ते पाणी पिऊन ते निघून गेले…मनाला सुख देणारा शनिवारच्या दुपारचा आनंदमयी क्षण प्रत्येक दि बा पाटील प्रेमासाठी होता. दि बा पाटील हे राहत असलेले पनवेलमधील बावनबंगला परिसरातील संग्राम या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी आले होते. पनवेलमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी उभारलेल्या लढ्यातील अनेक नेते शनिवारी मुख्यमंत्री शिंदे येथे येणार असल्याने उपस्थित होते. भाजपचे नेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बादली व नवी मुंबईतील अनेक नेते यावेळी उपस्थित होते. दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी दि. बांच्या विविध आंदोलने आणि साध्या राहणीमानाविषयी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. मुख्यमंत्री संग्राम या दि बांच्या निवासस्थानी येणार त्याच वेळी पनवेलमध्ये पाऊस पडत होता. छत्री घेऊन वाहनातून उतरुन स्वता मुख्यमंत्री शिंदे हे दि बांच्या घरी प्रवेश केल्यावर दि बा पाटील यांच्या कुटूंबियांसह अनेक भूमीपूत्र नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. शनिवारी पनवेल पालिकेच्या पोदी येथील शाळेत केंद्र सरकारतर्फे सूरु होत असलेल्या ५ जी इंटरनेट सेवेचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे पनवेल येथे आले होते.
हेही वाचा >>> तळोजात हे चाललंय तरी काय? कारखानदारांकडून घेतला जातोय जल प्रदूषण करणाऱ्यांचा शोध
या कार्यक्रमानंतर ते भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या घरी गेले. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेने रायगड ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले होते. या आंदोलनामुळे या परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राज्य सरकारला या आंदोलनाची दखल त्यावेळी घ्यावी लागली होती. महा विकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत दि बा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिंदे सरकारने तो ठराव अमान्य करत नव्याने मंत्रीमंडळ बैठक घेऊन दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव सुद्धा केंद्र सरकारकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे सिडको मंडळाकडे एकनाथ शिंदे यांनीच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्याविषयी पत्र दिले होते. त्यामुळे हा सर्व नामकरणाचा वाद सुरु झाला. अखेर शनिवारी ते मुख्यमंत्री शिंदे दि बा पाटील यांच्या घरी आल्याने दि बा पाटील प्रेमींनी आनंद व्यक्त केला.