नवी मुंबई : देशात वेगवान वाढ होणारे आणि तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेले नवी मुंबई शहर आता सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले असून याला पायबंद घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
एकीकडे हे आव्हान असले तरी दुसरीकडे मात्र महिला अत्याचार, विनयभंग आणि वाहनचोरीच्या प्रमाणात घट झालेली आहे. याशिवाय दोष सिद्धी प्रमाणात ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गुन्हे उकल होण्याचे प्रमाण २०२२ मध्ये ६७ टक्के होते. यंदा हे प्रमाण थेट ७३ टक्क्यांपर्यंत गेले आहे. पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २०२२ मध्ये ६ हजार ४४३ एकूण गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ४ हजार २९७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर २०२३ मध्ये ६ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी ४ हजार ८१२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२२ सालाच्या तुलनेत २०२३ सालात गुन्ह्यांत वाढ झाली असली तर गुन्हे उकल होण्याचे प्रमाणही ६ टक्क्यांनी वाढले आहे.
हेही वाचा >>>पनवेलमध्ये आतापर्यंत कुणबी मराठा एकाच कुटूंबियांची नोंद आढळली
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था उदयास येत आहे. या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत अंमली पदार्थ विक्रेत्यांनी जाळे विणले असल्याचे अनेक गुन्हे तपासात समोर आले आहे. त्यामुळेच नवी मुंबई पोलिसांनी ‘नशा मुक्त नवी मुंबई’अभियान सुरू केले असून त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहेत.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर २०२३ ऑगस्टमध्ये नेरुळ येथे सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. सायबर गुन्ह्यांत आर्थिक फसवणूक उग्र रूप धारण करीत आहे. २०२२ मध्ये २०७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी केवळ ७२ गुन्हे उकल करण्यात यश आले तर २०२३ मध्ये त्यात वाढ होत एकूण ४०३ गुन्ह्यांची नोंद झाली. यात ७६ गुन्हे उकल करण्यात आली आहे. यातील ३०२ गुन्ह्यांत ४७ कोटी ८५ लाखांची फसवणूक झाली आहे. सायबर पोलीस ठाण्यात आतापर्यंत ३८ गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी १३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. यात १४ कोटी ४६ लाख ८२ हजार २६४ रुपयांची फसवणूक झाली आहे. गुन्हा नोंद होताच तात्काळ ज्या बँकेत पैसे जमा केले तेथे संपर्क साधून खाते गोठवणे सुरु केल्याने आता पर्यत ३३ कोटी ७२ लाख ३९ हजार ८८९ एवढी रक्कम गोठवण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पनवेल : शांतिवन संस्थेच्या विश्वस्त मिरा लाड यांचे निधन
राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल (एन.सी.सी.आर.पी.) मध्ये नवी मुंबईतील ७ हजार ९१ तक्रारींची नोंद झाली आहे. त्यात ६७ कोटी रुपयांची फसणूक झाली असून त्यापैकी केवळ ६.७८ कोटी रक्कम गोठवण्यात आली आहे. एकूण गुन्हे पाहता २०२२ मध्ये दोष सिद्धीचे प्रमाण ३० टक्के होते तर २०२३ मध्ये हेच प्रमाण सहा टक्क्यांनी वाढून ३६ टक्के झाले. पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त अमित काळे, विवेक पानसरे, संजय डहाणे, तिरुपती काकडे, संजयकुमार पाटील उपस्थित होते.
परदेशी नागरिकांवर कारवाई
पोलिसांनी झडती घेतली असता सुमारे ५०६ नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे आढळले. नागरिकांमध्ये नायजेरिया – ४११, युगांडा – २६, डेकोट – २३, बांगलादेश – २१, घाना देशातील ११ नागरिकांचा समावेश आहे.
पनवेलमध्येहीसायबर पोलीस ठाणे
ऑगस्टमध्ये नेरुळ येथे सायबर पोलीस ठाणे उभे केले असले तरी गुन्ह्यांची वाढ पाहता आता परिमंडळ दोनमध्येही आणखी एक सायबर पोलीस ठाणे सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन शहरात आणखी चार पोलीस ठाणी वाढविण्यासाठी पोलीस दलाने हालचाली सुरू केल्या आहेत.
गुन्हे-६ हजार ६५६
गुन्हे उकल-४ हजार ८१२
मालमत्ता संबंधित गुन्हे प्रमाण– ३५ टक्के
सायबर गुन्हे-४०३
सायबर गुन्हे तपासात तांत्रिक अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच अंमली पदार्थ विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यकता आहे. त्याप्रमाणे पोलीस जनजागृती करीत आहेत.- मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई