नवी मुंबई एमआयडीसी लगत असलेल्या ठाणे बेलापूर महामार्गावर एका कंटेनरने थांब्यावरील रिक्षांना धडक दिल्याची घटना घडली आहे. बेरक नादुरुस्त झाल्याने कंटनेरने रिक्षा थांब्यावरील ७ ते ८ रिक्षांना धडक दिली. यात कोणी जखमी झाले नाही. या बाबत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
हेही वाचा- उरणमधील पाणजे डोंगरी परिसरात कोल्ह्याचे दर्शन
ठाणे बेलापूर महामार्गावर पावणे येथे रिक्षा थांबा आहे. एमआयडीसीत रात्रीही रहदारी असल्याने येथे रिक्षा रात्रीही प्रवाशांची वाट पहात उभ्या असतात. सोमवारी पहाटे साडे तीनचारच्या दरम्यान बेलापूर हून ठाण्याच्या दिशेने एक भरघाव कंटेनर निघाला होता. पावणे परिसरात सदर ट्रकचा ब्रेक नादुरुस्त झाला. आणि प्रवाशांची वाट पाहणाऱ्या रिक्षांच्या रांगेत कंटेनर घुसला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही. सर्व रिक्षा चालक रिक्षा पार्क करून एके ठिकाणी उभे होते अशी प्रार्थमिक माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिली. या अपघातात सात ते आठ रिक्षांचे नुकसान झालेले आहे. विशेष म्हणजे सदर रिक्षा थांबा इतर रिक्षा थांबा प्रमाणे रस्त्याच्या कडेला नसून रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत आहे. या बाबत पंचनामा सुरु असून कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : करोनाकाळाच्या दोन वर्षात कोकण रेल्वे महामंडळाला १३५ कोटींचा तोटा
सदर कंटेनर जप्त करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तांत्रिक तपासणीसाठी देण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल काय येतो यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली.