पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये पहिला करोनाबाधित खारघर वसाहतीमध्ये गुरुवारी आढळला असून महापालिकेच्या नागरी आरोग्य वर्धिनीतून संबंधित बाधिताने बाह्य रुग्णसेवेतून उपचार घेतल्यावर त्यास साथरोगाचा संसर्ग झाल्याचे उजेडात आले. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर हा बाधित त्याच्या घरात गृहविलगीकरणात राहिला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
खारघर वसाहतीमधील सेक्टर १६ येथील वास्तुविहार या इमारतीमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. तसेच कळंबोली वसाहतीमध्ये शुक्रवारी स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण पालिकेच्या आरोग्य विभागाला आढळला आहे. साथीचे आजार वाढल्याने रहिवाशांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.
करोना साथरोगासाठी पनवेल महापालिका सज्ज
करोनाबाधित पहिला रुग्ण पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे महापालिका आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेऊन सर्व आरोग्यसेवकांसह पालिका प्रशासनाला करोना विरोधातील सामन्यासाठी सज्ज राहण्याची सूचना केली आहे. महापालिकेकडे असणाऱ्या प्राणवायूच्या क्षमतेसह पुरेसा औषधसाठा तसेच सरकारी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णखाटा आणि पनवेल पालिका परिसरातील खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णखाटांचा आढावा घेतला आहे.
पनवेल महापालिकेचे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्याबरोबर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात १२९१ रुग्णखाटा करोनासाठी उपलब्ध आहेत. प्राणवायू असलेल्या ७८९ रुग्णखाटा, अतिदक्षता विभागात २५८ रुग्णखाटा, वेंटीलेटर रुग्णखाटा ९४ आणि प्राणवायू नसलेल्या २४४ खाटा उपलब्ध आहेत.
कोणालाही अद्याप मुखपट्टी सक्ती करण्यात आली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी मुखपट्टी घालावी, हात स्वच्छ धुवावे, ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी महापालिकेने सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपचार घ्यावेत. – गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका