नवी मुंबई: राज्यात पहिल्यांदाच आयटीएमएस प्रणाली नवी मुंबई परिवहन उपक्रमात सुरु करण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून ही प्रणाली बंद असून त्याचे अनेक फलक बाद झालेले आहेत. लवकर ही प्रणाली अपडेट केली नाही तर ९ कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबईत नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असले तरीही त्याची दुसरी बाजूही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत प्रवासी व अनेक अधिकारीही व्यक्त करीत आहेत.
नवी मुंबई परिवहन उपक्रम हा नवी मुंबई ,पनवेल आणि उरणच नव्हे तर आसपासचे मुंब्रा ,खोपोली, रसायनी पर्यत त्याचा विस्तार झाला आहे. यात आसूडगाव , घणसोली आणि तुर्भे येथून कारभार हाकला जातो. त्यात घणसोली डेपोचे खाजगीकरण झाले आहे तर तुर्भे आणि आसूडगाव हे एन.एम.एम.टी स्वतः चालवते. २०१८ मध्ये आयटीएमएस ही प्रणाली कार्यान्वित करणारी राज्यातील पहिली मनपा म्हणून त्यावेळी दावा करण्यात आला होता. या प्रणालीसाठी सुमारे १०० बस थांब्यावर इलेक्ट्रोनिक फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे बस किती मिनिटात त्या बस थांब्यावर पोचेल हे तिथे कळत होते.
हेही वाचा : वाहनाच्या फास्टटॅग व मोबाईलवरून दरोड्यातील गुन्ह्याची उकल
फलकावरील माहिती सरकती असल्याने त्या बस थांब्यावर येणाऱ्या सर्व बसची किती वेळात पोहचेल हि अत्यंत उपयुक्त माहिती मिळत होती. या प्रणाली साठी सुमारे ९ कोटींचा खर्च आला होता. या बाबत माहिती काढली असता सदर प्रणाली ही २ जी प्रणाली आहे तर नंतरच्या काळात आलेल्या नव्या बस मध्ये ४ जी प्रणाली व्यवस्था आहे. या अत्याधुनिक बस मध्ये विकत घेताना जी अत्याधुकीन प्रणाली आहे, त्या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे एनएमएमटीची प्रणाली असून नसल्यासारखी झाली आहे. यावर उपाय म्हणून नव्या बस खरेदीत संबंधित ठेकेदाराने बस मध्ये २ जी प्रणाली कार्यान्वित करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले हे आम्हाला माहिती नाही असे उत्तर माहितगाराने दिले.
या बाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी समंधीत अधिकार्यांना कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र भेट होऊ शकली नाही. तसेच फोन वरही अनेकदा प्रयत्न केला. विषयाचा संदेशहि पाठवला मात्र प्रतिकिया मिळू शकली नाही. आय टी एम एससमीर बागवान ( माजी सदस्य परिवहन समिती) आयटीएमएस प्रणाली आता जुनाट झाली आहे ती अपडेट करणे गरजेचे आहे. अन्यथा बस घेताना कंत्राटदाराने त्या बस मध्ये एनएमएमटी कडे असलेल्या प्रणालीशी जुळणारी प्रणाली देणे अनिवार्य आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ज्यामुळे केवळ तीन चार वर्षात कोट्यावधीचा खर्च बरबाद होण्याची भीती आहे.अनंत भालेराव (प्रवासी) आपली बस किती मिनिटात येणार आहे हे सहज कुठल्याही बस थांब्यावर कळत होते. आमच्या सारख्या घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या नौकरदार प्रवाशांना अत्यंत उपयुक्त वेळ वाचवणारी प्रणाली अशा पद्धतीने बंद पडणे योग्य नाही.
आयटीएमएस (इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मँनेजमेंट सिस्टीम ) साठी ९ कोटींचा खर्च झाला यात १०० रीड बोर्ड, एक हजार मशीन्स , १० प्रणाली ( जीपीआरएस/ जीएसपी, पीआयएस आदी) आणि पाच वर्ष देखभाल दुरुस्ती, आली. त्यामुळे अपडेट त्यात समाविष्ट आहे मात्र केले गेले नाही आणि का केले नाही हि विचारणाही कोणी करीत नाही. अपडेट साठी सुमारे ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे .
शासनाचा पुरस्कार मिळालेल्या एन एम एम टी उपक्रमात प्रवासी तिकिटातही इलेक्ट्रॉनिक मशिन्स याही जुनाट झालेल्या असून वारंवार बंद पडत आहेत. ऐन प्रवासात बंद पडलेल्या मशिन्समुळे अक्षरशः मशिन्सच्या तिकिटाचे कागद काढून त्यावर हाताने तिकीट रक्कम आणि कुठे जाणार हे पेनाने लिहून देण्याची नामुष्की ओढवली आहे.