पनवेल: यंदाच्या विसर्जनात डीजेचा वावरही सारखाच होता. मात्र ढोलताशांची पथकातील संख्या वाढवून गणेश विसर्जन मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत जोरदार काढण्यात आली. अनेकांचा उत्साह आणि अनेकांची झोपमोड अशा स्थितीमध्ये गुरुवारी पनवेल शहर आणि उपनगरातील नागरिक होते.
विशेष म्हणजे ध्वनी मर्यादा ओलांडल्यानंतर सुद्धा पोलीसांच्या दफ्तरी कोणतीच नोंद करण्यात आली नाही. पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी ६२१४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. पोलीस बंदोबस्त सर्वत्र कडेकोट असल्याने करंजाडे वसाहतीमधील प्रकार वगळता इतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हेही वाचा… गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न; महापालिकेचा खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा फोल
मात्र विसर्जन घाटांवर जाईपर्यंत उपनगरातील रस्त्यांवर ढोलताशांच्या निनादामध्ये मिरवणूकीत ध्वनी मर्यादाचे उल्लंघन केले गेले. रात्री १२ वाजेपर्यंत वाजविण्याची सवलत असल्याने अनेक उत्साही भक्तगणांचा नाचण्याचा पारा शिगेला पोहचला होता. ढोलपथकांमध्ये ढोलताशांच्या अतिवापरामुळे ध्वनी मोजमाप कशाने करावी आणि या मंडळांवर गुन्हे कसे दाखल करावे याचे नवे तंत्र पोलीस दलाकडे नसल्याने मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी मर्यादा ओलांडल्यानंतर सुद्धा पोलीसांनी एका सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळावर गुन्हा नोंदविला नाही. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिलेल्या माहितीनूसार पनवेलमध्ये कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याची माहिती दिली.