वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत नोव्हेंबर अखेर तसेच डिसेंबर पासून द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात होत असते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवेळी पावसामुळे एक महिना उशिराने द्राक्षांची छाटणी झाली आहे. त्यामुळे यंदा बाजारात द्राक्ष दाखल होण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे. यावर्षी द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास विलंब होणार असल्याचे मत घाऊक व्यापारी व्यक्त करीत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: पर्यटक परदेशी पाहुण्यांच्या प्रतिक्षेत! हिवाळा लांबल्याने फ्लेमिंगोच्या आगमनाला उशीर?
साधारणतः एपीएमसी बाजारात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द्राक्ष फळाच्या आवक सुरू होते. तसेच जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षांची अधिक आवक सुरू होत असून १५ एप्रिलपर्यंत हंगाम सुरू असतो. बाजारात नाशिक, तासगाव, सातारा आणि सांगली मधुन अधिक आवक होत असते. मात्र यंदा पावसामुळे द्राक्षांची छाटणीलाच उशिरा सुरुवात झाली आहे ऑक्टोबर महिन्यात छाटणी करण्यात येणार होती ती पावसामुळे मात्र नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे छाटणीला एक महिना उशीर झाल्याने उत्पादन घेण्याला ही विलंब होणार आहे परिणामी द्राक्ष बाजारात दाखल होण्यासाठी जानेवारी महिन्याची वाट पहावी लागेल अशी माहिती सांगलीचे बागायतदार नंदकुमार पवार यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा एपीएमसी बाजारात एक महिना उशिराने द्राक्षांच्या हंगाम सुरू होणार आहे.