आइस्क्रीम ही खरेतर पोटभर खायची चीज नव्हे; पण आईस्क्रीम–खवय्यांना ते कसे मान्य असणार?.. त्यांच्यासाठी वाशीत उभी आहे एक आईस्क्रीम बेकरी..
उन्हाळ्यातील रखरखता दिवस असो वा हिवाळ्यातील थंड रात्र. आइस्क्रीम प्रत्येकाचा ‘मूड’ नेहमीच हलका करते. चविष्ट, खुसखुशीत ‘बेक’ केलेला केक आणि आइस्क्रीम अशी तुलना होऊ शकत नाही, हे खरं आहे. तरीही काही लोक म्हणतात, आइस्क्रीम खाणं तसं चागलं नाही. म्हणजे अनेकांच्या मनात त्याविषयी भीतीच जास्त, पण या गोड मेजवानीचा आस्वाद घेतला तर त्याचे काही फायदेही आहेत. यावर काहींचा विश्वास बसणार नाही कदाचित! पण फायद्याची गोष्ट अशी आहे की आइस्क्रीम निर्मिती क्षेत्रातील काही बल्लवाचार्यानी शरीराला पोषक ठरणाऱ्या आइस्क्रीममध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि ऊर्जा देणारी तत्त्वे घालून ‘सव्र्ह’ करीत आहेत.
अर्थात ही सारी आइस्क्रीम ‘लाइव्ह’ बनवून दिली जातात. कोपरी नाका येथील ‘द आइस्क्रीम बेकरी’ या दुकानात सध्या यासाठी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जात आहेत. यासोबत आरोग्याची काळजीही घेतली जात आहे.
प्रशांत कुंभार आणि नितीन काशिद या पंढरपूरमधील दोन तरुणांनी नोकरीची मानसिकता न ठेवता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला. यासाठी दोघांनी ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती बेताची असतानाही काही वर्षे बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केली. नोकरी करता करता त्यांनी वांद्रे आणि ताडदेव येथे ‘फास्टफूड’चे दुकान थाटले. यात फ्रँकीची विक्री केली जात असे. या दोघांना स्वत:लाही खायची भारी हौस. नवनवे पदार्थ कुठे मिळतात, याचा शोध घेण्यासाठी केलेली भटकंती त्यांच्या कामी आली. त्यातही दोघांना घरच्या घरी असे पदार्थ बनविण्याची कला अवगत होती.
लाइव्ह आइस्क्रीमची संकल्पना प्रथम प्रशांत याच्या भाच्याने त्याच्या जवळ मांडली. त्यानुसार इंटरनेटवर शोधाशोध केल्यानंतर थायलंडमध्ये लाइव्ह आइस्क्रीमचा प्रकार लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीत अशी चारपाच दुकाने असल्याचे कळाले. तेथे जाऊन दोघांनी चौकशी केली आणि कोपरी नाका येथे दुकान थाटले. ताज्या फळांपासून अवघ्या मिनिटात आइस्क्रीम बनवून दिले जाते. रोज सकाळी तीन तासांची मेहनत करून त्याचा ‘बेस’ बनविला जातो. त्यासाठी रोज १५ ते १६ लिटर दूध, साखर आणि काही दुग्धजन्य पदार्थ लागतात. आइस्क्रीमसाठी रोज विविध फळे लागतात. यात अननस, पेरू, सीताफळ, चिकू, कलिंगड, टरबूज, स्ट्रॉबेरी आणि पपईचा समावेश असतो. आइस्क्रीम बनविण्यासाठी सात ‘शेफ’ ठेवण्यात आले आहेत. आइस्क्रीम केक हीसुद्धा इथली खासियत आहे. केकमध्ये चीझ केक, रेड वेल्वेट केक, बटरस्कॉच पेस्ट्रीज उपलब्ध असतात. मागणीनुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त करून केक तयार केले जातात. रात्री शतपावलीसाठी आलेल्यांना ही ‘अनोखी मेजवानी’ ठरत आहे. त्यामुळे रात्री नऊ वाजता येथे खवय्यांची गर्दी होते. दिवाळी, तसेच विशेष सणांसाठी ‘देशी मॅशअप’ म्हणजे विविध मिठायांपासून तयार केलेली आइस्क्रीम ठेवण्यात येतात. महाविद्यालयीन तरुणांची खास गर्दी येथे दिसून येते. विशेष म्हणजे दुकानात ‘फिडबॅक बोर्ड’ ठेवण्यात आला आहे. त्यावर ग्राहक आपली मते नोंदवतात.
द आइस्क्रीम बेकरी
- शॉप. शॉप नं-१३,मार्केट कॉम्पेल्क्स, सेक्टर-२९,
- कोपरी नाका बसस्टॉपच्या जवळ, वाशी.
- वेळ – दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत