उरण : २०११ पासून करंजा मच्छिमार बंदराचे काम सुरू असून ते एक तपानंतरही अपूर्णावस्थेत आहे. मात्र येथील मच्छिमारांनी हे बंदर कार्यान्वित करून घाऊक मासळी खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार, छोटे मोठे व्यवसायिक, बर्फ विक्री करणारे व मजूर यांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तर दुसरीकडे खवय्यांना स्वस्त मासळी मिळणार आहे.
मुंबईतील ब्रिटीशकालीन ससून डॉक बंदरावरील मासे खरेदी विक्रीसाठी होणार विलंब व गर्दी टाळण्यासाठी या बंदराला पर्याय म्हणून २०११ पासून उरणच्या करंजा बंदराच्या उभारणीचे काम सुरू आहे. बंदरातील मूलभूत गरजांची कामे अपूर्ण असल्याने मच्छिमार प्रतीक्षेत आहेत. मात्र करंजा बंदराचे काम अपूर्ण असतानाही येथील मच्छिमारांनी स्वतः हे बंदर कार्यान्वित केले आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत न जाता करंजा मोरासह अनेक बंदरातील मासेमारी आपल्या मासळीचा व्यवहार करीत आहेत. अत्याधुनिक करंजा बंदराचा वापर राज्यातील सर्वच मच्छीमार व मासळी खरेदी विक्री करणाऱ्यांनी वापर करावा, असे आवाहन करंजा मच्छिमार संस्थेने केले आहे.
हेही वाचा – खांदेश्वर वसाहतीमधील अर्धाफूट खड्ड्यात वाहने आपटून प्रवास
मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्चून रखडत – रखडत उभारण्यात येत असलेला करंजा मच्छीमार बंदर मच्छीमारांनी वापर करण्याचा निर्णय करंजा मच्छीमार संस्थेने घेतला आहे. त्यामुळे या अत्याधुनिक करंजा बंदराचा वापर राज्यातील सर्वच मच्छीमार व मासळी व्यवसायिकांनी करण्याचे आवाहन करंजा मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे.
राज्यातील मासळी व्यावसायिक व मच्छीमारांसाठी पकडलेली मासळी बंदरात उतरवणे, खरेदी-विक्री, लिलाव, आयात-निर्यात करण्यासाठी मुंबईतील ससुनडॉक व कसारा या दोनच बंदरांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील लाखो मच्छीमारांसाठी उरलेल्या एकमेव ससुनडॉक बंदराचाच आधार आहे. मात्र सुमारे ७०० ते ७५० क्षमतेचे ससुनडॉक बंदर मच्छीमारांसाठी अपुरे पडत होते. ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊन १२ वर्षांपूर्वी करंजा येथील बंदरात १००० मच्छीमार बोटींच्या क्षमतेचे अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांयुक्त नवीन बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता. मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराचा खर्च अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. या वाढलेल्या खर्चाची केंद्र व राज्य सरकारने अर्धी-अर्धी म्हणजेच ७५-७५ कोटी जबाबदारी उचलली असून त्यानंतरच निधी अभावी रखडलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र त्यानंतरही बंदराचे काम अद्यापही रखडत- रखडत सुरू आहे. त्यानंतरही जेट्टीची उंची दीड-दोन फुटांपर्यंत वाढविण्यासाठी आणखी काही कोटींच्या निधीची कमतरता भासत आहे. बंदर कार्यान्वित करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या. मात्र बंदराचे काम ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आल्यानंतरही हलगर्जीपणामुळे अद्यापही अनेक कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत. आणखी किती कालावधी लागेल याचीही माहिती नाही. त्यामुळे बंदरांतील कामे पूर्ण झाली नसतानाही केवळ मच्छीमारांचे हित लक्षात घेत करंजा मच्छीमार सहकारी संस्थेने करंजा मच्छीमार बंदरातूनच आगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – फुंडे, डोंगरी, पाणजेच्या हजारो ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा खड्डेयुक्त चिखलातून प्रवास
दरम्यान महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बंदराचे काम काही अंशी झाले नसल्याने अद्याप तरी करंजा मच्छीमार बंदर मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले नसल्याची माहिती बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.