नवी मुंबई: गौरी-गणपती सणात भाज्या आणि त्यामध्ये विशेषतः पालेभाज्यांना अधिक मागणी असते. सध्या पावसाची रिपरिप तर कडक उन या हवामान बदलाने मेथीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे एपीएमसीत मेथीची आवक घटली असून किरकोळ बाजारात गृहिणींना मेथीच्या एका जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत आहेत.
सध्या वातावरणातील बदलाने मध्येच पावसाच्या तुरळक सरी तर मध्येच उन्हाच्या झळा यामुळे मेथीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात अवघी ५० टक्केच आवक होत आहे. एपीएमसीत मोठ्या प्रमाणावर पुणे आणि नाशिक येथील पालेभाज्या दाखल होत असतात. मात्र सध्या बाजारात लातूर, उस्मानाबाद आणि कर्नाटक येथून दाखल होत आहेत.
पुणे आणि नाशिक येथील मेथी अगदी कमी प्रमाणात आहे. बुधवारी एपीएमसीत ९ गाड्या दाखल झाल्या असून २ लाख ९० हजार क्विंटल आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात आवक घटल्याने घाऊक मध्ये दरात वाढ झाली असून प्रतिजुडी २०-२५ रुपयांनी विक्री होत आहे. तेच किरकोळ बाजारात मात्र मेथीची दुप्पट दराने विक्री होत असून एक जुडी पन्नास रुपयांनी विक्री होत आहे.
हवामान बदलाने मेथीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारात मेथीची अवघी ५०%आवक होत आहे. परिणामी मेथीच्या घाऊक दरात वाढ झाली असून प्रतिजुडी २०-२५रुपयांनी विक्री होत आहे. – संदेश धावले, व्यापारी, एपीएमसी
बाजारात आधी दहा ते पंधरा रुपयांनी उपलब्ध असलेली मेथीची जुडी आता चक्क पन्नास रुपयांवर गेली आहे. गौरी-गणपती सणात पालेभाज्यांना अधिक महत्त्व असते त्यामुळे गृहिणी हमखास पालेभाज्या खरेदी करीत असतात. मात्र मेथीच्या वाढत्या दराने अचंबित केले आहे. – सुमल जवळ , गृहिणी