नवी मुंबई: मराठा आंदोलनाने अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतले असून बीड जिल्ह्यातील बीड आणि माजलगाव येथील आमदारांचे निवासस्थानी जाळपोळ झाली तसेच आज सकाळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर हल्ला झाला. एकंदरीत मराठा आंदोलन पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही सर्व आमदारांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केल्यावर त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. नवी मुंबईतही गेल्या काही दिवसात विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. लाक्षणिक उपोषण, कॅण्डल मार्च, मशाल फेरी, बंद आदी मार्गाने पाठिंबा वाढत असताना अचानक दोन दिवसापूर्वी बीड आणि माजलगाव येथील आमदारांच्या निवास्थानी आंदोलकांनी जाळपोळ केली. तसेच आज सकाळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. विशेष म्हणजे सदर गाडी मंत्रालय इमारती नजीक पार्क केलेली होती. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा… आता नवी मुंबईतही बार वाईन शॉप बंद झाल्यावर दारू विक्रेते फेरीवाले …..
लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त करण्यात येत असल्याने नवी मुंबईतील पनवेल, उरण, बेलापूर, आणि ऐरोली तसेच एक विधान परिषद आमदारांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. याबाबत माहिती देताना विशेष शाखा उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले कि सर्व लोकप्रतिनिधींचे निवासस्थान आणि कार्यालयास आवश्यकतेनुसार पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. नवी मुंबईत कुठलाही असा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जात असून पोलीस विभाग सतर्क आहे. असे हि त्यांनी सांगितले.