पनवेल : चार दिवसांपूर्वी पनवेल रेल्वेस्थानकातील पूर्वबाजूस नवीन पनवेल वसाहतीमध्ये स्थानक परिसरात ३९ वर्षीय प्रियंका रावत या प्रवासी महिलेचा अनोळखी मारेक-यांनी खून केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाने वेगवेगळी शोधपथक स्थापन करुन मारेक-यांचा तपास सुरु केला होता. पोलिसांच्या अधिक तपासात प्रियंका यांच्या पतीने व त्याच्या प्रियसीने हा कट रचून मारेक-यांना सुपारी दिल्याचे उजेडात आले आहे. देखतसिंग असे प्रियंका यांच्या संशयीत आरोपी पतीचे नाव आहे. देखतसिंग याचे अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रियंका यांना नुकतीच कळाली होती. प्रियंका आणि देखतसिंग हे परिवारासह विहीघर गावातील महालक्ष्मी सोसायटीत राहत होते. प्रियांका या ठाणे येथील डीजीटल मार्केटींग कंपनीमध्ये काम करुन संसाराला मदत करत होत्या.
त्या नेहमीप्रमाणे गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पनवेल स्थानकात उतरल्या .त्यानंतर त्या ५ मिनिटांनी स्थानकाबाहेर (नवीन पनवेल) रिक्षा थांब्याशेजारी पायी चालत असताना तेथे दबा धरुन बसलेल्या मारेक-यांनी त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्या रक्ताच्या थोराळ्यात पडल्या. वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्या ठार झाल्या. या घटनेमुळे रात्रीच्यावेळेच लोकलने एकाकी प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या घटनेनंतर खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी मारेक-यांना लवकरच अटक करु असे सांगितले होते. पोलिस या प्रकरणात अजूनही काही संशयितांना लवकरच अटक करणार असल्याने पोलीसांनी अधिक माहिती देणे टाळले.