नवी मुंबई: सध्या श्रावण सुरू असल्याने बहुतांश घरात उपवास सुरू आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी असो वा बटाटा चिप्स, साबुदाना पापड, असे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाणा तेलाची विक्री वाढली आहे. मात्र हीच संधी साधून शेंगदाणा इसेन्स टाकून पाम तेलाचे रूपांतर शेंगदाणा तेलात करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे.
एपीएमसी मधील दाणा मार्केट स्थित एका गो डाऊन मध्ये भेसळीचे तेल बनवून विक्री केले जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे या ठिकाणी धाड टाकल्यावर पोलिसही चक्रावले अशी स्थिती होती. या ठिकाणी पाम तेलाचे अनेक पिंप होते. याच पाम तेलावर प्रक्रिया करून मागणी प्रमाणे तेल बनवले जात होते.
मोहरीचे तेल असो वा सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल असो. त्या त्या पदार्थाच्या वासाचे इसेन्स टाकून पाम तेलावर प्रक्रिया करून हे खाद्य तेल बनवले जात होते . धक्कादायक बाब म्हणज नामचीन खाद्यतेल कंपन्यांचे रिकामे पॅकेट , बाटल्या, आदि साहित्य या ठिकाणी होते. त्यात हे भेसळीचे तेल भरून राज्यात अनेक ठिकाणी तसेच गुजरात मध्येही पाठवले जात होते.
हेही वाचा… पोलीसांच्या आवाहनामुळे यंदाची ईद मिरवणूक दुस-या दिवशी निघणार
पोलिसांनी सदर गोडाऊन सील केले असून या बाबत अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती दिली आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन सर्व तेलाचे नमुने घेतले आहेत. त्याचा फॉरेन्सिक अहवाल आल्यावर संबंधित व्यक्ती व कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात येईल अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.