नवी मुंबई : संरक्षित क्षेत्र झालेल्या ३० एकरच्या डीपीएस फ्लेमिंगो तलावात भरतीचे येणारे पाणी अडवल्यामुळे प्रवळ साचले होते. त्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासच धोक्यात आला होता. परंतु आता डीपीएस तलाव हा संरक्षित राखीव क्षेत्र झाल्याने या तलावात येणाऱ्या खाडीतील खाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर आता पालिका व राज्याच्या वन विभागाचे लक्ष राहणार असून पालिका लवकरच या ठिकाणी नव्याने सततच्या पाणी प्रवाहासाठी नवीन पाईपलाईन टाकणार आहे.
डीपीएस तलावात येणारे पाणी रोखल्याने मागील काही वर्षे डीपीएस तलावात येणाऱ्या फ्लेमिंगोंचा अधिवासच धोक्यात आला होता. त्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणातील प्रवळ साठून या पाण्याला दुर्गंधी येत होती. भरतीचे पाणी तलावात येऊन पुन्हा ते ओहोटीच्यावेळी समुद्रात जायला हवे परंतु हे पाणी अडवले होते.
ऐरोली, बेलापूर खाडीमार्गे पाहणीदरम्यान वनमंत्री नाईक यांनी डीपीएस तलावात समुद्राचे येणारे व जाणारे पाणी सिडकोनेच अडवले असून ते तात्काळ खुले करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच हा तलाव संरक्षित राखीव क्षेत्र घोषित केल्याने फ्लेमिंगोंचा अधिवास कायम झाला आहे. हजारो फ्लेमिंगोंना आकर्षित करणाऱ्या तलावात मोठ्या प्रमाणात प्रवळ साठले होते आणि तलाव चिखलाने भरला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधीही येत होती. तर दुसरीकडे सिडकोनेच पाण्याचा प्रवाह काही महिन्यांपासून बंद केला होता अशी तक्रार नॅटकनेक्ट फाऊंडेशनने मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानाला पक्ष्यांचा धोका टाळण्यासाठी डीपीएस तलाव आणि एनआरआय, टीएस चाणक्य आणि पाणजे पाणथळ यांसारखी स्थलांतरित पक्ष्यांची ठिकाणे जतन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सराकारने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे पक्षीप्रेमी व नागरिक आनंदीत झाले आहे. शासनाने डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर पालिकेने या तलावात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सातत्याने सुरू राहण्यासाठी या ठिकाणी असलेल्या जुन्या पाईपलाईन काढून टाकल्या आहेत. पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी चर काढला आहे. त्यामुळे येथे लवकरच पालिकेच्यावतीने नव्याने पाईप टाकणार असून भरतीच्या पाण्याचा प्रवाह अव्याहत सुरू राहण्यासाठी सुयोग्य व्यवस्था केली जाणार आहे.
डीपीएस तलाव हा संरक्षित राखीव क्षेत्र घोषित झाल्याने आता खाडीतून या तलावात पाणी येण्या-जाण्याच्या मार्गावर पालिकेबरोबरच वन विभागाचेही लक्ष राहणार आहे. – सुधीर मांजरे, वनपरीक्षक अधिकारी
सरकारच्या निर्णयानंतर नेरुळ जेट्टीच्या खालच्या भागातून डीपीएस तलावात येणारे भरतीचे पाणी ये जा करण्यासाठी नव्याने पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. लवकरच हे काम करण्यात येणार आहे.- पंढरीनाथ चौडे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका
खाडीतून तलावात पाणी येण्याचा मार्ग बंद केल्यानेच डीपीएस तलावात पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. आता शासनाच्या निर्णयानुसार नवी मुंबई महापालिका या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम करणार आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या मार्गातील ठरलेला अडसर आता कायमचा दूर होणार आहे.- बी. एन. कुमार, नॅटकनेक्ट