नवी मुंबई: खारघर रायगडमध्ये येतं, नवी मुंबईत नाही, हे लक्षात घ्या आणि ‘एनएमएमटी’चे उपकार माना की नवी मुंबईच्या बस रायगडमध्ये सोडल्या जातात. सोमवारी रात्री ११ वाजून २३ मिनिटांची खारघर रेल्वे स्थानकातून सुटणारी ५३ क्रमांकाची बस नादुरुस्त घोषित केल्यानंतर खारघर चौकीच्या नियंत्रकाने बसच्या चौकशीसाठी आलेल्या प्रवाशांना दिलेले हे वरील उत्तर अनपेक्षित आहेच, पण गेले काही महिने ‘नादुरुस्ती’च्या नावाखाली बस रद्द करण्याचा सपाटा एनएमएमटी व्यवस्थापनाने लावल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खारघर स्थानकातून तळोजा फेज -१ आणि फेज-२ परिसरासाठी ४५ क्रमांकाची बस सोडली जाते. या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या बसची वारंवारिता बस क्रमांक ५३ आणि ५४ च्या तुलनेत अधिक आहे. करोनाआधी तर ५४ क्रमांकाची वारंवारिता दर दहा मिनिटांनी होती. त्यातील आता अर्ध्या बस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक तासाने बस सोडली जात आहे.

हेही वाचा… नवी मुंबईतही पावसाच्या सरी

बस क्रमांक ५३ ही खारघर सेक्टर-३६मधील व्हॅली शिल्प परिसरासाठी आहे. तर ५४ क्रमांकाची बस शीघ्र कृती दलाच्या मुख्यालयापर्यंत जाते. दोन्ही बससाठी प्रवासी संख्या मोठी आहे. रात्री दहानंतर मुंबईहून परतणाºया प्रवाशांची संख्याही अधिक आहे. मात्र, रात्री साडेदहानंतर वेळापत्रकानुसार बस सोडल्या जात नाहीत, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

‘एनएमएमटी’च्या बससाठीचे भाडे १५ रुपये आहे. रात्री अकरानंतर हे भाडे १७ रुपये घेतले जाते. भाड्याबद्दल प्रवाशांची काहीही तक्रार नाही. पण काही गाड्या रद्द केल्या जातात. त्या वेळेत सोडल्या जात नाहीत. त्यामुळे खोळंबा होतो, असे ५३ क्रमांकाचे नियमित प्रवासी असलेले यशवंत डफळे यांनी सांगितले.

हेही वाचा… ठाण्यासह नवी मुंबईत अचानक जोरदार पावसाला सुरुवात, नागरिकांची उडाली धांदल

तळोजा फेज-१ आणि फेज-२ खारघर सेक्टर-३५ आणि ३६ मधील अनेक जण रात्री साडेदहानंतर मुंबई आणि ठाण्याहून परततात. बससेवेच्या भरवशावर अनेक जण बसथांब्यावर येऊन रांगेत उभे राहतात, परंतु कधी-कधी पाऊण तासांनीही बस सोडली जात नाही. त्यामुळे नाइलाजास्तव काही प्रवाशांना खासगी वाहने वा रिक्षांसाठी अवाजवी पैसे देऊन घर गाठावे लागत असल्याचे मोहम्मद गडकरी यांनी सांगितले.

करोनापूर्व काळापर्यंत खारघर स्थानक ते आरएएफ अशी रात्री एक वाजून तीन मिनिटांची बस सुरू होती. त्याचा फायदा रात्री ठाणे आणि मुंबईहून येणाºया दोन ते तीन रेल्वेगाड्यांतील प्रवाशांना होत होता. करोनानंतर जग पूर्वस्थितीत आले त्यालाही दीड वर्ष उलटले. पण शेवटच्या गाडीची मागणी लोकांकडून केली जात असतानाही ती होत नाही.

चालक-वाहकांची मनमानी?

रात्री नऊनंतर व्हॅलीशिल्पला आलेल्या काही बसचे चालक-वाहक आपल्या मनानुसार मार्ग बदलून गाड्या हाकत असल्याचे काही प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले. ‘थेट खारघरला बसायचे तरच बसा’ अशा शब्दांत मधल्या प्रवाशांना खासगी वाहनांच्या कृपेवर सोडून गाडीचे वाहक आणि चालक जात आहेत. त्यामुळे मधल्या भागातील प्रवासासाठी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नादुरुस्त बसचा भरणा

‘लोअर फ्लोअर’ बस अनेकदा रस्त्यात बंद पडतात. काही वेळेला फेरी पूर्ण करून स्थानक थांब्यावर परतणाºया बसही बंद पडतात. त्या दुरुस्त करण्यासठी एनएमएमटीचे तंत्रज्ञ बोलावले जातात. त्यात साधारण तास, दीड तासाचा कालावधी निघून जातो. त्यानंतर ती बस रद्द केली जाते. रात्री अकरानंतर खारघर चौकीतील नियंत्रक निघून जातो. त्यामुळे चौकशी कोणाकडे करायची हा प्रश्न असतो. एनएमएमटी प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना आखली नसल्याचे चित्र आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The nmmt managements plan to cancel buses in the name of disorder has added to the anger of the passengers navi mumbai dvr
Show comments