नवी मुंबई : पामबीच मार्गाच्या घणसोली ते ऐरोली विस्तारीकरण प्रकल्पासाठी पालिकेने मागवलेल्या निविदा प्रक्रियेत ५१५ कोटींची निविदा प्राप्त झाल्याने हा प्रकल्प दृष्टिपथात आला आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पातही या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात येणार आहे. महापालिकेकडे या प्रकल्पासाठी निविदा प्राप्त झाल्या असून जवळजवळ ५४० कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी येणार असून त्यासाठी सिडको २७० कोटी रुपये देणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिकेने संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त केल्या आहेत. ऐरोली-मुलुंड खाडी पुलापर्यंत रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित आराखड्यामुळे रस्त्याची लांबी ३.४७ कि.मी.ने वाढणार आहे.तसेच याच मार्गावर १.९५ कि.मी.चा उड्डाणपूलही होणार आहे. सिडकोने बेलापूर ते ऐरोली सेक्टर १० ए पर्यंत २१.१२ कि.मी. लांबीचा पामबीच रस्ता प्रकल्प प्रस्तावित केला होता.

हेही वाचा…अभियंत्यांची शैक्षणिक अर्हता तपासणी करा, नवी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांबाबत ‘अलर्ट सिटीझन फोरम’ची मागणी

बेलापूर ते घणसोली हा १९.२० कि.मी.चा रस्ता सिडकोने बांधला होता, परंतु उर्वरित दोन किलोमीटरचे काम खारफुटी क्षेत्र असल्याने रखडले होते. परंतु आता पामबीच मार्गाचे विस्तारीकरण होणार असल्याने मोठी वाहतूक सुविधा निर्माण होणार आहे. २००९ मध्ये सिडकोने अपूर्ण पामबीच रस्ता प्रकल्पासह घणसोली नोडही नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला होता.

नवी मुंबई महापालिकेने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी, वन विभाग, खारफुटी संवर्धन समिती, पर्यावरणसंबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या मिळवल्या आहेत. केवळ मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी प्रलंबित आहे. उर्वरित पामबीच विस्तारीकरणात रस्त्याचे बांधकाम ३.४७ किमीचे असून उड्डाणपूल हा १.९७ कि.मी.चा असल्याची माहिती या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली असून या प्रकल्पासाठी आता वेगाने काम कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा…अटल सेतूवर एनएमएमटीची धाव; बसने मुंबई गाठता येणार, तिकीटदर अद्याप अनिश्चित

दळणवळण वेगवान

घणसोली-ऐरोली पामबीच विस्तारीकरण प्रकल्पामुळे नागरिकांना वाहतुकीची चांगली सुविधा मिळणार असून हा प्रकल्प ऐरोली-मुलुंड पूल आणि निर्माणाधीन ऐरोली-काटई मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि इतर भागात जाण्यासाठी वेगाने प्रवास करता येईल. याशिवाय, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा…१७०० कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र कळंबोलीत – उद्योगमंत्री उदय सामंत

या प्रकल्पासाठी मे. जयकुमार यांची ५१५ कोटीची निविदा प्राप्त झाली असून दर कमी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणाबाबतची उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यावर तात्काळ संबंधित प्रकल्पासाठी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात येतील. – संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The palm beach road extension project got rs 515 crore tender now pending approval from the bombay high court psg
Show comments