उरण : जेएनपीए बंदर परिसरात कंटेनरचालकांच्या हत्या करण्यात येत असल्याचा संदेश समाजमाध्यमातून पसरविणाऱ्या व्यक्तीला न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती गुजरात येथील असून पंकज गिरी असे त्याचे नाव आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उरण परिसरात ट्रेलरचालकांची हत्या करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमातून पसरविण्यात आली होती. या संदेशामध्ये सरपंचाच्या मुलाचा अपघात झाल्याने तो संतप्त झाला असून १११ ट्रेलरचालकांची हत्या करणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तर, उरण परिसरात १५ ते २० चालकांची हत्या करण्यात आली असल्याची माहितीदेखील देण्यात आली होती. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उरण तालुक्यातील जेएनपीटी आणि आसपासच्या परिसरातील ट्रेलरचालकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये तक्रार नोंदविण्यात आली होती.
हेही वाचा – अटल सेतूवर वाढीव गस्त, वाहतूक पोलिसांची ६५० बेशिस्त वाहनांवर कारवाई
हेही वाचा – स्वच्छ रेल्वे स्थानकांत पनवेल अव्वल
या प्रकरणी कारवाई करीत न्हावा शेवा पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करीत गुजरात येथील बडोदा येथून पंकज गिरी याला अटक करण्यात आली आहे. तर, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी केले आहे.