सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींना अडीच वाढीव चटई निर्देशांक देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भाजप सरकारने घेतल्यानंतर वाशी येथील आठ इमारतींच्या रहिवाशांना वाढीव एफएसआय देण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या नगर नियोजन विभागाने गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे वाशी येथील हजारो रहिवाशांनी दोन दिवस अगोदरच दहीकाला साजरा केला. या इमारतींचे प्रस्ताव यानंतर वाढीव एफएसआय मागणाऱ्या इमारतींसाठी पथदर्शी प्रस्ताव ठरणार आहेत. त्यामुळे शहरात वाढीव एफएसआयमुळे तयार होणारे मोठय़ा घरांचे हे पहिले आठ टॉवर उभे राहणार आहेत.नवी मुंबईतील वाढीव एफएसआयचा प्रश्न गेली वीस वर्षे चर्चिला जात आहे. सिडकोने बांधलेल्या निकृष्ट बांधकामामुळे आजही अनेक रहिवासी भीतीच्या छताखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे वाढीव एफएसआय देऊन या घरांची पुनर्बाधणी करण्यात यावी, हा नवी मुंबईतील निवडणुकांसाठी पहिला मुद्दा मानला जात होता. पालिकेने पाठविलेल्या अडीच वाढीव एफएसआयला आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंजुरी दिली. त्यामुळे हा निर्णय अध्यादेशाच्या फेऱ्यात अडकला. त्यानंतर आघाडी सरकार पायउतार होऊन नवीन युती सरकार राज्यात सत्तेवर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर लगेच जुन्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली. त्यात हा वाढीव एफएसआयचा निर्णय अडकला. तो घेण्यात यावा यासाठी आमदार संदीप नाईक, मंदा म्हात्रे आणि माजी मंत्री गणेश नाईक, नगरसेवक किशोर पाटकर आग्रही होते. युती सरकारने या निर्णयाचा योग्य अभ्यास करून त्यावर सहा महिन्यांपूर्वी मंजुरीची मोहर उठवली. त्यामुळे नवी मुंबईत सिडकोच्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी अक्षरश: दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी केली. यात वाशी जेएनवन, जेएनटू प्रकारात राहणाऱ्या रहिवाशांचा जास्त सहभाग होता. त्यांनी निकृष्ट घरात काढलेल्या नरकयातनांचा या निर्णयामुळे शेवट होणार आहे. या निर्णयानंतर सहा महिन्यांनी वाशी येथील श्रद्धा, कैलाश, एकता, जय महाराष्ट्र, एफ टाइप (दोन) अवनी, पंचरत्न या इमारतींतील सुमारे १७०० रहिवाशांनी वाढीव एफएसआयचे प्रस्ताव पंधरा दिवसांपूर्वी पालिकेच्या नियोजन विभागाला सादर केले होते. या प्रस्तावासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यात पूर्तता केल्याने या इमारती वाढीव अडीच एफएसआयसाठी पात्र असल्याचे पत्र पालिकेने या रहिवाशांना गुरुवारी दिले. त्यामुळे या रहिवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे या रहिवाशांना ३५० चौरस फूट घराऐवजी मोठे घरे मिळणार असून, त्याच्या किमती गगनाला भिडणार आहेत. वाढीव एफएसआयमुळे पालिकेला वाशी सेक्टर नऊ विभागातून सुमारे २९७ कोटी रुपये विकास शुल्क मिळणार आहे. सध्या पात्र असणाऱ्या आठ इमारतींच्या पुनर्विकासात कमीत कमी ६७ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होणार असल्याने कडकी लागलेल्या पालिकेच्या तिजोरीला संजीवनी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा