पनवेल : मुंबई गोवा महामार्गाचे बांधकाम काॅंक्रीटीकरणाचे काम सूरु असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पावसाळी दौरा काढून महामार्गावरील खड्यांची समस्या जाणून घेतली. शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी मंत्री चव्हाण पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आले. यावेळी पनवेलचे भाजपचे आ. प्रशांत ठाकूर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री चव्हाण यांचा दौरा ७ वाजून ५६ मिनीटांनी सूरु झाला. पनवेल येथील पळस्पे फाटा येथील रस्त्यावर चाललेल्या पाण्यातून मंत्री चव्हाण यांचा गाड्यांचा ताफा गेला. मागील चार वर्षांपासून रस्त्याकडेला पळस्पे फाटा येथे पावसाळी पाणी साचत आहे.
मंत्री चव्हाण यांच्या दौ-याची सुरुवात पळस्पे फाटा येथील साचलेल्या पाण्यातून वाट काढत झाली. सरकारने मार्ग रुंदीकरण केले डांबरीकरण केले मात्र पावसाळी पाणी जाण्यासाठी अद्याप गटार बांधू शकले नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत पळस्पे फाटा येथील रस्ता येतो. या विभागात असणारे अधिकारी महमार्गाशेजारी गटार करण्याचे नियोजन आहे मात्र जागेचा वाद असल्याने हे गटार होऊ शकले नसल्याचे सांगतात. मुंबई गोवा महामार्गाची सुरुवात खड्यांनी होते. पळस्पे फाटा येथील पुलाजवळ खड्डे मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा >>> अचानक पेट घेतलेल्या गाडीमुळे मुंबई पुणे मार्गावर वाहतूक कोंडी
गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील एक मार्गिका तरी चांगल्या पद्धतीची होण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. ४२ किलोमीटर महामार्गातील एक मार्गिका सूरु करण्यात येईल. सध्या ४२ पैकी १२ किलोमीटर महामार्गाचे एका मार्गिकेचे काम झाले आहे. पावसाळा असल्याने अडचणी आहेत. तरी अधिकारी व ठेकेदार हे शेल्टर लावून महामार्गाचे काम करण्याच्या तयारीत आहेत. – रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री