नवी मुंबई: शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमाच्या चौकटीतुन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच विद्यार्थी वाहतुकीची परवानगी दिली जाते. यंदा अवैध शालेय बस वाहतुकीचे प्रमाण कमी असले तरी अद्याप परवानगी न घेतलेल्या बस चालकांना शाळेच्या व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी ही पासिंग, कागदपत्रांची पूर्तता करता येईल. शालेय बस चालकांनी मागणी केली तर सुट्टीच्या दिवशी, रविवारी देखील आरटीओ कार्यालय खुले ठेवण्यात येईल अशी माहिती आरटीओ विभागाने दिली आहे.
मागील वर्षी अवैध, नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बसचे प्रमाण अधिक होते. यातील बहुतांश बसेस नियमांना बगल देत विनापरवाना कागद पत्रांच्या पूर्तता अभावी चालत असल्याचे आरटीओ ने केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. नियमानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. त्यामुळे यंदा शाळा प्रशासनाने वाहतूकदारांकडे योग्यता प्रमाणपत्र आहे की, नाही याची शहानिशा करूनच विद्यार्थी वाहतूक परवानगी दिली आहे.
हेही वाचा… नवी मुंबई: कंटनेरचा ब्रेक फेल झाल्याने पाच गाड्यांचे नुकसान; एक रिक्षा प्रवासी महिला जखमी
तरीदेखील यावेळी आतापर्यंत ११ अवैध शालेय वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात आजमितीस १२०० शालेय बस नोंदीत आहेत. यातील बहुतांश वाहनांनी कागद पत्राची पूर्तता करून पूर्ण तपासण्या केल्या आहेत. उर्वरित बस चालकांनी रविवारी देखील आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी केल्यास सुरू ठेवले जाईल अशी माहिती वाशी उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.