नवी मुंबई,ठाणे व रायगड या तीन जिल्हयातील पर्यटकांसाठी एकमेव असलेल्या उरणच्या पिरवाडीच्या समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर गेल्याचे चित्र आहे. मुरुड येथील २०१७ च्या पर्यटकांच्या मृत्यू नंतर शासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक यंत्रणा तयार केली होती ही पर्यटक सुरक्षा यंत्रणाही मोडीत निघाली आहे. यामध्ये स्थानिकांना प्रशिक्षण देऊन पर्यटकांना सुरक्षा देण्यात येत होती. त्याचप्रमाणे उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर समुद्रातील हालचाली व पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी या किनाऱ्यावर एक टेहळणी मनोराही तयार करण्यात आला होता. या मनोऱ्याची दुरावस्था झाली आहे. हा लोखंडी मनोरा सडला आहे. त्यामुळे तो धोकादायक ही बनला आहे.
उरणच्या नागाव व केगाव या ठिकाणी समुद्र किनारे आहेत. या किनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उरण मधील स्थानिक नागरिक तसेच पनवेल,नवी मुंबईतील व ठाणे जिल्ह्यातील ही पर्यटक येत असतात. त्यामुळे एक एका दिवसाच्या पर्यटनासाठी हा किनारा पर्यटकांच्या पसंतीचा ठरत आहे.उरण मध्ये औद्योगिक क्षेत्रात प्रमाणे नागरीकरणात ही वाढ झाली आहे. यामध्ये सिडको कडून विकसित करण्यात येत असलेले द्रोणागिरी नोड,त्याचप्रमाणे उरण शहराच्या आसपास वाढणारी गावे व उधोगमुळे ग्रामीण भागात ही लोकवस्तीत वाढ झाली आहे. यामुळे विरंगुळा म्हणून समुद्र किनाऱ्यावर सुट्टी घालविण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे पिरवाडी किनाऱ्यावर मोठी गर्दी होते. यामध्ये अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरतात. यातील अनेकांना पोहता येत नाही. त्याच प्रमाणे समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने समुद्राच्या पाण्यात पर्यटक बुडण्याची शक्यता वाढते.
आशा प्रकारच्या घटना यापूर्वी पिरवाडी किनाऱ्यावर घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शासनाने एक शासनादेश काढून पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी नियमावली तयार केली होती. यात स्थानिक तरुणांना सागरी सुरक्षा रक्षक म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांना पर्यटकांचे जीव वाचविण्यासाठी एक होडी,जीवरक्षक जॅकेट,दोऱ्या आदींची व्यवस्था करण्याचे सुचविण्यात आले होते. यामध्ये समुद्र किनाऱ्यावर टेहळणी मनोरा याची व्यवस्था करण्याच्या सूचना ही होत्या. त्यानुसार उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर मनोरा उभारण्यात आला आहे. मात्र महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे मनोरा पूर्ण सदला आहे. तर पर्यटकांना वाचविण्यासाठी असलेली यंत्रणा ही निद्रस्त झाली आहे. त्यामुळे उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर गेली आहे. मागील दोन वर्षात करोना मुळे पर्यटक नव्हते मात्र सध्या करोना मुक्तीचा काळ आल्याने पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.त्याचप्रमाणे उरण परिसरात स्थानिक(गावठी)पदार्थ त्याच प्रमाणे राहण्यासाठी अनेक सर्व सुविधांनी सज्ज हॉटेल निर्माण झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या वास्तव्याची ही व्यवस्था झाली आहे. यासंदर्भात उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता या सुरक्षा यंत्रणेची माहिती घेतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.