उरण : शुक्रवारी लागलेल्या आगीत बोरी नाक्यावरील अनधिकृत भंगार गोदाम जळून खाक झालं, मात्र या आगीत गोदमालगत असलेल्या उरणमधील व्यवसायिक परेश तरडे यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घरात महिनाभरात त्यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य आणि वस्तू यांच्या नुकसानीमुळे गोदामाच्या आगीत हे लग्न घरही होरपळलं आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्यासाठी पूर्व तयारी म्हणून घराच्या सजावटी व रंगरंगोटी आणि इतर कामांसाठी लाखो रुपयांचा खर्च केला होता. मात्र गोदामाच्या भीषण आगीत हा सर्व खर्च आणि घरातील रोजच्या वापरातील वस्तू, एसी, फ्रीज, फर्निचर, यासह किमती सामानही नष्ट झाले आहे. या घराच्या नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल करीत उरणमधील व्यवसायिक परेश तरडे यांनी टाहो फोडला आहे.
हेही वाचा – सकल मराठा समाज समिती, सीवूड्सच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
आपण या अनधिकृत गोदमासंदर्भात अनेकदा नगरपरिषद, उरण तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे संबंधित गोदाम मालकाकडून आपल्याला मारण्याची धमकी मिळाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – जासई उड्डाणपूल खुला झाल्याने प्रवास सुसाट; मात्र एकच मार्गिकेमुळे कोंडी कायम
गोदामातील आगीमुळे गोदामाशेजारील नागरिकांच्या झालेल्या नुकसानभरपाईची कोणतीही तरतूद नाही. मात्र ज्या भूखंडावर हे अनधिकृत गोदाम उभारण्यात आले आहे. त्याची माहिती घेऊन त्या विभागाला सूचना करण्यात येणार असल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे. गोदामाच्या आगीची प्राथमिक चौकशी पोलीस करत आहेत.