उरण: पंचवीस वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील उरण खारकोपर दरम्यानचा दुसरा टप्पा २६ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या मार्गावरील लोकल धावणार आहे. लोकलला पंतप्रधान नरेंद मोदी हे हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे उरणकरांचे अनेक वर्षांचे रेल्वेने मुंबई गाठण्याचे स्वप्न दिवाळी पूर्वी साकार होणार आहे.

२६ ऑक्टोबरला खारघर येथील एका कार्यक्रमासह नवी मुंबई मेट्रोचे उदघाटन करणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्याची जोरदार तयारी ही सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. त्याचप्रमाणे उरण ते खारकोपर या मार्गावरील रेल्वेच्या कामानाही वेग आला आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता उरण रेल्वे स्थानकात या मार्गावरील विद्युत यंत्रणा तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानकांच्या परिसरातील कामे ही वेगाने सुरू आहेत.

हेही वाचा… शवागारामुळे पनवेल शहरात दुर्गंधी

स्थानकांच्या सफाईची कामे सुरू आहेत. येथील सूचना फलक, टाईम बोर्ड आदींची ही तपासणी सुरू आहे. या मार्गावरील नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या तरघर तर खारकोपर ते उरण दरम्यानचे गव्हाण स्थानकाचे काम अपूर्ण असून फेब्रुवारी २०२४ ला ही कामे पूर्ण होणार असली तरीही तरघर स्थानकाचे काम अपूर्ण असतांना २०१८ ला नेरुळ ते खारकोपर लोकल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळेच उरण ते खारकोपर वरील लोकलचा मार्ग वाहतुकीला खुला होणार असल्याचे खात्रीशीर संकेत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून उरण मध्ये ही लोकल सुरू होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा… उरणमध्ये शारदोत्सवात गावदेवींचा जागर तर घरोघरी पारंपरिक घटस्थापना

उरण मधील नागरिकांच्या रेल्वे सेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रेल्वेच्या विद्याविहार येथील विद्युत वाहनाने खारकोपर पासून गव्हाण,रांजणपाडा, न्हावा शेवा,द्रोणागिरी व उरण या मार्गावरील वीज वाहिन्यांची तपासणी केली. मार्ग सुरू होण्यापूर्वी ही अशाच प्रकारची तपासणी करण्यात येते अशी माहिती विद्युत तपासणी कर्मचाऱ्यांनी दिली. या तापसणीमुळे पुन्हा एकदा उरण मधील नागरिकांच्या नजरा या मार्गाकडे लागल्या आहेत.

Story img Loader