१ डिसेंबरपासून प्रारंभ; वाशी, घणसोली, सीबीडी बस स्थानकातही चार्जिग केंद्रे

केंद्र सरकारकडून ‘फेम १’ योजनेअंतर्गत ६० टक्के अनुदानातून नवी मुंबईला मिळालेल्या सर्व ३० विद्युत बस नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या असून १ डिसेंबरपासून त्या प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर धावतील, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली. या विद्युत बस टप्प्या टप्प्याने आल्या असून यातील काही बस सध्या प्रवासी वाहतूक करीत आहेत.

केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयाने शहराअंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत बसचा वापर वाढावा यासाठी महापालिकांना ६० टक्के अनुदानावर विद्युत बस देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने ‘फेम १’ या योजनेअंतर्गत ३० बसचा प्रस्ताव केंद्राला पाठविला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर या बस गेल्या काही महिन्यांपासून टप्प्या टप्याने नवी मुंबई दाखल झाल्या होत्या. यापूर्वी २० बस शहरात आल्या होत्या. प्रायोगिक तत्त्वावर परिवहन उपक्रमाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या विद्युत वातानुकूलित १५ बसची प्रवासी सेवा सुरू केली होती. साध्या बसचे तिकीट तात्पुरते आकारले जात होते. २१ नोव्हेंबर रोजी उर्वरित सर्व बस नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आल्या आहेत. प्रादेशिक परिवहनकडून तपासणी झाल्यानंतर १ डिसेंबरपासून या सर्व ३० विद्युत बस आता नवी मुंबईत प्रवासी वाहतूक करणार आहेत. या पर्यावरणपूरक विद्युत बसमुळे प्रदूषणालाही आळा बसणार असून इंधन बचतीलाही हातभार लागणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या बस सेवेला गेल्या काही दिवसांत चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे प्रवासी संख्याही वाढत आहे. आता या सर्व बस सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत अधिक वाढ होईल, असे ‘एनएमएमटी’ प्रशासनाने सांगितले.

आणखी शंभर बसचा प्रस्ताव

केंद्र शासनाच्या ‘फेम १’ याजनेअंतर्गत १५ विद्युत बस परिवहन उपक्रमात दाखल झाल्या आहेत. याव्यतिरिक्त आणखी १०० विद्युत बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून तो केंद्राच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे प्रशासनाने सांगितले. चार्जिग केंद्रही वाढणार

तुर्भे बस स्थानकात चार्जिग

स्टेशन उभारण्यात आले आहे.  एका वेळी ४ बस चार्जिग करता येत आहेत. आता सर्व ३० बस रस्त्यावर धावण्यासाठी चार्जिग स्टेशनही वाढवण्यात येणार असून घणसोली, वाशी रेल्वे स्टेशन व सीबीडी बस स्थानकात चार्जिग केंद्रांचे काम सुरू आहे.

नवी मुंबई परिवहनच्या ताफ्यात सर्व ३० विद्युत बस आल्या असून १ डिसेंबरपासून सर्वच बस रस्त्यावर धावणार आहेत. या बससाठी आणखी चार्जिग स्टेशनही बनवण्यात आली असून त्यांचेही काम अंतिम टप्प्यात आहे. – शिरीष आरदवाड, व्यवस्थापक एनएमएमटी 

Story img Loader