नवी मुंबई: राज्य शासनाने नवी मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार दोन शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी नऊ महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये परवानगी दिली असताना शहरात पालिकेची महाविद्यालये स्थापनेची प्रक्रिया कागदावरच राहिली आहेत.दहावीच्या निकालानंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदतही संपत आली, परंतु नवी मुंबई महापालिकेची कुकशेत व कातकरी पाडा येथील कनिष्ठ महाविद्यालये कागदावरच राहिलेली आहेत. त्यामुळे याबाबत महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिकेत सराठी, हिंदी, उर्दू माध्यमासह राज्यातील सीबीएसई शाळा सुरू करणारी पहिली महापालिका असा टेंभा मिरवला जात असताना दुसरीकडे शासनाने ९ महिन्यांपूर्वी पालिकेला महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली असूनही यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही महाविद्यालये कागदावरच राहणार आहेत.नवी मुंबई महापालिकेत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांबरोबरच उच्च माध्यमिक महाविद्यालये सुरु करण्याची मागणी पालिकेच्यावतीने राज्य शासनाकडे करण्यात आली होती.

हेही वाचा >>>ग्रामीण पनवेलमध्ये महावितरण कंपनीचे वायरमेन जखमी

नवी मुंबई महापालिकेच्या कातकरीपाडा व कुकशेत येथील शाळेत उच्च माध्यमिक विद्यालये सुरू करण्यासाठी पालिकेने परवानगी मागितली होती. सप्टेंबर २०२३ मध्येच महापालिकेला दोन उच्च महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली आहे. परंतू नव्या शैक्षणिक वर्षाची व उच्च महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल महापालिका प्रशासनामध्ये दिसत नाही.महापालिका शिक्षण विभागात सातत्याने होणारा सावळागोंधळ अजून किती वर्षे सुरूच राहणार व त्यामुळे सर्वसामान्य पालकांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षणापासून वंचित राहवे लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेला शासनाकडून परवानगी मिळूनही उच्च माध्यमिक महाविद्यालये का सुरू होत नाहीत याबाबत पालिका अधिकारी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.

पालिकेच्या शिक्षण विभागात मनमानी प्रकार सुरु असून मनाला वाटेल त्या शिक्षकांना कायम केले जाते तर अनेकांवर अन्याय केला जातो. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून विद्यार्थ्यांना सुविधाच पुरवता येत नसतील तर सगळ्या निवडणुका होईपर्यंत नव्या शाळा सुरूच करू नयेत नाहीतर या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायला नवे कुरण मिळेल.- सुधाकर सोनावणे, माजी महापौर

सारसोळे येथे सीबीएसई शाळा गेल्या वर्षी सुरु करुनही या मुलांना गणवेश, वह्या इतर साहित्य अधिकाऱ्यांनी मिळवून दिले नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत त्याचा आयुक्तांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी.- सूरज पाटील, माजी लोकप्रतिनिधी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state government has delayed starting junior colleges in two schools as per the demand of navi mumbai municipal corporation amy