नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळ मार्केट समोरील रस्ते व पदपथावर फेरीवाले नेहमीच आपले बस्तान मांडून बसतात. मागील आठवड्यात डॉन विक्री करणाऱ्या महिलांनी अतिक्रमण कर्मचारी महिलेला मारहाण केली होती. त्यावेळी संबंधित फेरीवाल्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. फेरीवाल्यांना कोणताही धाक राहिलेला नसून आजही रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे.
एपीएमसी फळ मार्केट समोरील रस्ता हा ,सानपाडा रेल्वे स्थानक, शिव पनवेल महामार्ग, तुर्भे हे एकमेकांना जोडणारा आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अवजड वाहने ,मोठे टेम्पो, इतर वाहनांची अधिक रहदारी असते.तसेच एपीएमसी बाजारात खरेदीकरिता येणाऱ्या ग्राहकांची ही मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर हे फेरीवाले पदपथ असोत किंवा रस्ता या ठिकाणी सर्रास बसून व्यवयसाय करीत असतात. या फेरीवाल्यांनी पदपथावर व रस्त्यावर आपला व्यवसाय मांडल्याने या रस्त्यावरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून सानपाडा रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने येथे रोज हजारो नागरिक मार्केट मध्ये ये जा करत असतात.
हेही वाचा… मॅफको परिसराला अवकळा, शीतगृह क्षेत्रात स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी
मात्र या फेरीवाल्यांनी रस्ता अडवून ठेवल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे. शिवाय या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी देखील होत असते. मागील आठवड्यात याठिकाणी महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. मात्र यावेळी महिला फेरीवाल्यांनी महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यावर संबंधित फेरीवाल्यांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र तरीदेखील याठिकाणी जैसे थेच परिस्थिती पहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस फेरीवाल्यांची दादागिरी वाढत असून ग्राहक येणार नाही, म्हणून पदपथावर उभे राहण्यासाठी देखील पादचाऱ्यांना मज्जाव केला जात असल्याचे प्रकार देखील घडत आहेत.