नवी मुंबई : उरण फाटा तसेच तुर्भे स्टोअर परिसरातील उड्डाणपुलांची कामे सुरू करण्यात आल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. पावसाळ्यात सर्वाधिक त्रासदायक ठरलेल्या उरण फाटा उड्डाणपुलाच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा समावेश आहे.
गेल्या पावसाळ्यात वाहनचालकांना प्रचंड डोकेदुखी ठरलेल्या शीव-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावरील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम आता सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गेले दोन दिवस वाहतूक पोलिसांनी वाहतुकीबाबत प्रात्यक्षिक घेतले. खारघर, कळंबोली, पनवेल व इतर सर्व परिसरातील वाहनचालकांना वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>>पनवेल : शांतिवन संस्थेच्या विश्वस्त मिरा लाड यांचे निधन
तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणचा रस्ताच अपुरा पडत आहे. ही वाहतुक कोंडी टाळण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होऊ नये या करीता पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
तुर्भे उड्डाणपुलाच्या कामानिमित्ताने ठाणेकडे जाताना चार पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. ठाणेकडे जाताना तुर्भे उड्डाणपुलाकडून सानपाडा वाशीमार्गे ठाण्याकडे जाऊ शकता. दुसरा मार्ग तुर्भे नाक्याहून एपीएमसी उड्डाणपूलमार्गे वाशी तसेच ठाणेकडे जाता येईल.
हेही वाचा >>>खारघरमध्ये राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह, देशभरातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग
तिसरा पर्यायी मार्ग तुर्भे नाक्यावरून उजवे वळण घेऊन एमआयडीसी मार्गे महापे, कल्याण व ठाणेकडे जाऊ शकतात. चौथा मार्ग म्हणजे तुर्भे उड्डाणपुलाखालून उजवे वळण घेऊन विवांता हॉटेलमार्गे एमआयडीसी मार्गाने महापेकडे जात पुढे ठाण्याकडे जाऊ शकता. ठाण्याकडून वाशी, बेलापूर वा पनवेलकडे जाण्यासाठी पावणे उड्डाणपुलावरून एमपीएमसी मार्केट रस्त्याने पुढे जाऊ शकतात.
पर्यायी मार्ग
मुंबई कडे जाण्यासाठी कळंबोली सर्कल येथून अटल सेतू मार्ग वापरावा. तर पनवेलहून ठाण्याकडे जाण्यासाठी कळंबोली सर्कल येथून तळोजा मार्ग वापरावा. सीबीडी-वाशी-ऐरोलीकडे जाण्यासाठी पामबीच मार्गाचा वापर करावा. तसेच सीबीडीतून मुंबईकडे जाण्यासाठी दिवाळे सिग्नल, किल्ला जंक्शन मार्गे अटल सेतू मार्गाचा अवलंब करावा.