पनवेल: महापालिका परिसरातील विविध उपनगरांमध्ये दीड दिवसांच्या ७९५५ गणेशमूर्ती विसर्जन बुधवारी झाले. यामध्ये कळंबोली येथील रोडपाली तलावात सर्वात उशीरा म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत विसर्जन सूरु होते. पनवेल पालिकेची यंदाची संकल्पना तलाव स्वच्छ आणि पर्यावरणाचे अधिकाधिक रक्षण करणे हे असल्याने पालिका प्रशासनाने यासाठी कर्मचा-यांचे विशेष पथक विसर्जनस्थळी नेमले होते. दिडशेहून अधिक कर्मचा-यांचे हे पथक रात्रपाळीत कृत्रिम तलाव, नैसर्गिक तलावातील तराफांमध्ये विसर्जित केलेल्या गणेशमुर्ती सूरक्षित काढून, त्या पुन्हा समुद्रात नेण्यासाठी सकाळी आठ वाजेपर्यंत राबत होते.
पनवेल महापालिकेने यंदा पहिल्यांदा उपनगरांतील चौकाचौकात ११४ मूर्तीदान केंद्र उभारली होती. या मूर्तीदान केंद्रात पनवेल पालिकेला महात्मा फुले आर्ट सायन्स महाविद्यालय, पिल्लई महाविद्यालयाच्या एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांची मदत मिळाली. हे विद्यार्थी गणेशमुर्तीच्या दान झाल्यानंतर त्याची नोंद ठेवण्यासाठी पालिकेच्या कर्मचा-यांसोबत सहकार्य करत होते. पनवेलमधील अनेक स्वयंसेवी संघटनांनी यासाठी हातभार लावला. ठाकूर इन्फ्रा प्रा. लीमीटेड या कंपनीने (टीआयपीएल) पालिकेला ५० ट्रक मोफत दिले होते.
पनवेल पालिका क्षेत्रात ५९ ठिकाणी निर्माल्य कलश दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी पालिकेने ठेवले होते. या कलशामध्ये सूमारे 50 मेट्रीक टन निर्माल्य पालिकेकडे जमा झाला. हे निर्माल्य पालिका सिडको मंडळाच्या घोटगावाजवळील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात खत बनविण्यासाठी देणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. तसेच या खताचा वापर पालिकेच्या उद्यानांमध्ये केला जाणार असल्याचे उपायुक्त पवार म्हणाले. पालिकेच्या रात्रपाळीत दिडशे कर्मचा-यांना नेमूण दिलेले काम सर्वात कठिण होते.
हेही वाचा… पनवेलला डेंग्यू, मलेरियाचा फास; जेमतेम दीड महिन्यात डेंग्यूचे १४८ तर मलेरियाचे ७९ रुग्ण
रात्रभरात मूर्ती विघटन होण्यापूर्वी त्या सूरक्षित समुद्रात जाणा-या बोटीपर्यंत पोहचविणे, यासाठी कर्मचा-यांनी विविध टेम्पोमधून या मूर्ती जमविल्या. 2468 गणेशमूर्ती यावेळी दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनावेळी मिळाल्याने त्या मूर्ती खोल समुद्रात विसर्जन गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत केले जाईल, असे पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सांगीतले. तसेच पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनात जास्तीत जास्त गणेशभक्तांनी मूर्ती दान करावी, किंवा गणेशभक्तांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्याचा पर्याय निवडता येईल. असे आवाहन पालिकेने केले आहे.