पनवेल: कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात चोरीचे सत्र सूरुच आहे. गुरुवारी कळंबोली पोलीस ठाण्यात लोखंड बाजारातील गोदाम क्रमांक १९२८ मध्ये ७ लाख ३३ हजार रुपयांचे स्टेनलेस स्टील चोरीला गेल्याची तक्रार व्यापा-यांनी नोंदविली. ही चोरी २५ डिसेंबर ते ९ जानेवारी या दरम्यानमध्ये झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी बाजारातील वाढत्या चो-या रोखण्यासाठी स्वता बाजाराच्या स्थितीची पाहणी केल्यानंतर १०० सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे बाजार समितीला सूचविले. सध्या सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे काम सूरु असले तरी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील पथदिव्यांची विज घालवून गोदामे फोडणारी टोळी बाजारात सक्रीय आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोखंड व पोलाद खरेदीविक्रीची उलाढाल कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात होते. हा बाजार मात्र असूरक्षित आहे. बाजारातील असुविधांमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. पथदिवे बंद असणे, पोलीसांची गस्त अपुरी आणि सीसीटिव्ही कॅमरा नसने हे सारे चोरट्यांसाठी पोषक वातावरण आहे. चोरीच्या तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात व्यापारी किंवा त्यांचे प्रतिनिधी गेल्यावर त्यांनाच मालाची पावती दाखवा, सीसीटिव्ही लावले का, रखवालदार का नेमले नाही अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वैतागुण मागील पाच वर्षात व्यापारी किरकोळ चोरीच्या तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात येत नाहीत.
हेही वाचा >>>उरणच्या जलमार्गांची रखडपट्टी; मोरामुंबई व करंजा रेवस ‘रो-रो’ मार्ग अपूर्णच
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे काही व्यापा-यांनी थेट ही व्यथा मांडल्यानंतर मागील वर्षी जानेवारी महिन्यात गोदाम क्रमांक ६६४ मध्ये स्थानिक पोलीसांना अंधारात ठेऊन पोलीसांच्या विशेष पथकाने धाड टाकून दिडशे मेट्रीक टन सळईंचा ३५ लाख रुपयांचा माल जप्त केला. १२ हून अधिक आरोपी या प्रकरणात पोलीसांच्या तावडीत सापडले. वर्ष उलटल्यानंतर पुन्हा या बाजारातील सळईचा अवैध व्यवसाय तळोजा परिसरात छुप्या पद्धतीने केला जात असल्याची चर्चा आहे. अजूनही व्यापा-यांच्या मागील चोरट्यांची शुक्लकाष्ट संपलेले नाही. कळंबोली येथील लोखंड गोदाम क्रमांक १९२८ येथील व्यापारी सूरेशकुमार बोहरा यांनी दिलेल्या तक्रारीनूसार २५ डिसेंबर ते ९ जानेवारी या दरम्यानच्या काळात ७ लाख ३३ लाख ९०० रुपयांचे स्टेनलेस स्टीलचे सामान चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील पत्रा तोडून गोदामात प्रवेश करुन लुट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कळंबोलीतील लोखंड बाजारातील चो-यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदी राजेंद्र पाटील यांची नियुक्ती आयुक्त भारंबे यांनी केली आहे. यापूर्वी पोलीस ठाण्यात लोखंड बाजारातील भंगार व्यावसायिकांचा येजा होता. पाटील हे या सर्व चोरट्यांना कळंबोलीतून हद्दपार करतील अशी अपेक्षा आहे.