नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरीगाव येथे राहणारी एक महिला भाजी आणण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेली, मात्र घरी परत आल्यावर घराचा कडी कोयंडा तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सव्वासहा ते सात या केवळ पंचेचाळीस मिनिटांत चोर आले. त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले व आत प्रवेश करीत अजून एका कपाटाचे कुलूप तोडून चोरी केली व निघूनही गेले.
यातील फिर्यादी हितेश भानुशाली हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवसाय करतात. ते राहत असलेल्या शिवशक्ती निवास या घरात सदर प्रकार घडला. हितेश हे स्वतः एपीएमसीमध्ये नियमित व्यवसाय करीत असताना त्यांची आई घराला कुलूप लावून भाजी आणण्यासाठी म्हणून बाहेर पडल्या. मात्र घरी परत आल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरी झाल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती हितेश यांना दिली. माहिती मिळताच हितेश हे स्वतः घरी आले. घरातील वस्तूंची पाहणी केली असता शयन कक्षातील लाकडी कपाटातून १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.