भुरटय़ा-जबरी चोऱ्या, लूटमार सुरूच; औद्योगिक वसाहतींची सुरक्षा वाऱ्यावर

मोटारसायकलवरून येऊन मोबाइल फोन किंवा सोनसाखळी हिसकावून नेणे, एकटय़ा-दुकटय़ा व्यक्तीला गाठून शस्त्राचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम लुटणे, बँक किंवा एटीएम केंद्रातून बाहेर पडलेल्या व्यक्तीवर नजर ठेवून रक्कम लुटणे, पहाटे अंधारात व्यायामासाठी जाणाऱ्यांना लक्ष्य करणे हे प्रकार नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात नित्याचेच झाले आहेत. पोलिसांनी विविध मोहिमा राबवून आणि पथके तयार केल्यानंतरही या चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात यश आलेले नाही. निवासी क्षेत्रासह एमआयडीसी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

महामुंबई परिसरातील पादचारी असुरक्षित असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. भुरटय़ा चोऱ्या, लुटमार, फसवणुकीचे अनेक गुन्हे नवी मुंबई रोजच्या रोज घडत आहेत. शहरात तुर्भे, शिरवणे, तळोजा, घणसोली, कोपरखैरणे, कोपरी परिसरात मोठा औद्योगिक पट्टा आहे. तेथील रस्त्यांवर संध्याकाळनंतर शुकशुकाट असतो. काही ठिकाणी पथदिव्यांचाही अभाव असल्यामुळे रस्ते अंधारात बुडून जातात. अशा वेळी एकटय़ादुकटय़ा कर्मचाऱ्यांना गाठून लुटण्याचे प्रमाण मोठे आहे. रस्त्याकडेला मोबाइल फोनवर बोलत उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातातील फोन खेचून पसार होणे, अंधारलेल्या, निर्मनुष्य रस्त्यांवर पादचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणे, इजा करणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नोंदवल्या जात आहेत.

नवी मुंबई, पनवेल परिसरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. नोकरी व्यवसायानिमित्त येथे येणाऱ्यांचीही त्यात भर पडली आहे. या वाढत्या गर्दीचा गैरफायदा चोरटे घेऊ लागले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी पैसे, मोबाइल किंवा दागिने लांबविले जाण्याचे प्रमाण मोठे आहे. येथील शीव-पनवेल महामार्गावरील काही बसथांबे आणि रेल्वे स्थानकांचे परिसर भुरटय़ा चोरांचे अड्डे बनले आहेत. अशा ठिकाणांवर पोलिसांनी वारंवार कारवाई केल्यानंतरही चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे.

तुर्भे, महापे एमआयडीसीत चोर आणि गर्दुल्ले अंधाराचा गैरफायदा घेत असल्याचे दिसते. येथे अनेक ठिकाणी पथदिवे नाहीत. मुकंद कंपनी, महापे, पावणे एमआयडीसी येथे तुरळक ठिकाणीच पथदिवे आहेत. येथे पगाराच्या दिवशी लुटण्याचे प्रकार घडतात. एरव्हीही चोऱ्या, धमकावण्याचे प्रकार होतात, मात्र बहुतेक नोकरदार पोलीस ठाण्यात जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे किंवा तक्रार केल्यास पुन्हा त्रास दिला जाण्याच्या भीतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत नाहीत आणि त्यामुळे कारवाई करणे अशक्य होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. येथील कर्मचाऱ्यांना ठाणे-बेलापूर महामार्ग गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. चोरटे याचा गैरफायदा घेतात. एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६, २०१७ मध्ये एकही तक्रार दाखल झालेली नाही. २०१८ मध्ये एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला, मात्र त्याची उकल झाली आहे.

भुरटय़ा चोरांचे अड्डे

जुईनगर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या नाल्याजवळील परिसर, सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील मोकळा भाग, तुर्भे एमआयडीसीतून जुईनगर रेल्वेस्थानकाकडे येणारा महामार्गावरील पूल, तुर्भे रेल्वे स्थानक परिसर, महापे, नेरुळ एलपी बसथांबा, बेलापूर उड्डाणपुलाखालील परिसर, बेलापूर खिंड, वाशी बसथांब्याजवळील परिसर, वंडर्स पार्कबाहेरील मोकळी जागा, नेरुळ स्थानकाजवळील अभ्युदय बँकेसमोरील परिसर, जॉगिंगची ठिकाणे, पावणे एमआयडीसीतील मुख्य रस्ता, तुर्भे नाका, पटनी परिसरातील कंपन्यांचा वर्दळ नसलेला भाग.

 

तुर्भे एमआयडीसीत दोन वर्षांत लूटमार, जबरी चोरीचे प्रकार तुरळक प्रमाणात घडले आहेत. तसेच बिट मार्शल, पोलिसांची टीम येथे दिवस-रात्र गस्त घालते.

अमर देसाई, पोलीस निरीक्षक

नवी मुंबई परिसरात वाढती लोकसंख्या व बेकारी यांमुळे भुरटय़ा चोऱ्या वाढल्या आहेत. चोऱ्यांचे प्रमाण आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. भुरटय़ा चोऱ्यांच्या प्रकरणांत वारंवार दोषी आढळलेल्यांना तडीपार करण्यात आले आहे. चोरी, लुटमार करणाऱ्यांविरोधात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

सुधाकर पाठारे,

पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

नवी मुंबईमधील पोलीस मुख्यालय हद्दीतील चोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी वारंवार असे गुन्हे घडतात तिथे गस्त वाढवून चोऱ्यांवर नियंत्रण मिळवले आहे. गुन्हे शाखेकडूनही यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

तुषार दोशी, उपायुक्त, गुन्हे विभाग

पावणे एमआयडीसीत मुख्य ठिकाणी, चौकांत पथदिवे नाहीत. काही ठिकाणी पथदिवे आहेत, परंतु दोन दिव्यांत खूप मोठे अंतर आहे. येथे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.

अजय नोघोट, कर्मचारी

Story img Loader