महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळंबोली येथील उड्डाणपुल नवीनच बांधला असला तरी या उड्डाणपुलावर भले मोठे ख़ड्डे पडले आहेत. याच खड्यांमध्ये अवजड वाहनांची चाके रुतल आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसोबत इंधनाचा अपव्यय होत आहे. वाहनचालक व प्रवाशांना चार मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तासांचा विलंब प्रवास करावा लागत आहे.
कळंबोली येथील उड्डाणपुल तीन वर्षांपूर्वी बांधणा-या कंत्राटदाराने या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. हा पुल वाहनांसाठी खुला केल्यावर काही महिन्यात त्याला तडे गेल्याने त्याची पुन्हा डागडुजी करण्यात आली. डागडुजी ठिक न झाल्याने या पुलावर एक ते दिड फुटाचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांना कोंडीचा सामना करावा लागतो. सध्या याच वाहतूक कोंडीमुळे पुलावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रांग दिसते. त्यामुळे अनेक वाहनचालक पनवेलहून मुंब्रा मार्गावरील कळंबोली उड्डाणपुलाचा प्रवास टाळून पुलाखालील सेवा रस्ता किंवा लोखंड बाजारातील रस्त्याने वाहने दामटतात.
हेही वाचा: जेएनपीसीटी बनले देशातील पाहिले ‘पीपीपी’ धोरण राबविणारे बंदर
पुलावरील खड्यांमुळे पुलाचा वापर कमी होत असल्याने पुल उभारणीच्या मुद्याला हारताळ फासला गेला आहे. याचा फटका लोखंड पोलाद बाजारातील वाहनांना सहन करावा लागत असून पुलाखालील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसते. लोखंड बाजारात प्रवेश करणा-या पुलाखाली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लीटर पाणीही रस्त्यावर येत असल्याने हिवाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पाण्यामुळे वाहतूक कोंडी करणा-या पोलीसांना सुद्धा चिखलात उभे राहून वाहतूक नियमन करावे लागते. लोखंड पोलाद बाजार समिती, एमएसआरडीसी आणि पनवेल पालिका या तीनही यंत्रणा या परिसरात काम करत असल्याने नेमके या मार्गातील खड्डे कोण बुजविणार हे नक्की नसल्याने या कोंडीमागील रस्त्यातील खड्डे आणि एमजेपीचे पाणी गळती यावर कायम स्वरुपी तोडगा निघू शकलेला नाही.
हेही वाचा: सावधान! “विजेचे बिल न भरल्याने पुरवठा खंडित करीत आहेत”, फोन आल्यास करु नका आर्थिक व्यवहार
एमएसआरडीसीने संबंधित कंत्राटदाराला कळंबोली उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्तीचे आदेश दिल्याप्रमाणे त्या कंपनीने कामाला सूरुवात केली आहे. तरीही अजून दोन आठवडे हे काम सूरु राहील. उड्डाणपुल बांधल्यापासून त्याची पहिल्या चार वर्षांची दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीची राहणार आहे. यंदाचा पावसाळा अधिक महिने असल्याने हे खड्डे पडले असावेत. यावेळचे काम अधिक चांगल्यापद्धतीने करुन घेतले जाईल. -एन. परमार, उप अभियंता, एमएसआरडीसी