उरण : येथील द्रोणागिरी नोडमधील पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा फटका नागरिक आणि वाहनचालकांना बसत आहे. द्रोणागिरी नोडमधील नवघर ते खोपटे दरम्यानच्या मार्गाला भेंडखळ पेट्रोल पंप, खोपटे पूल चारफाटा आदी ठिकाणच्या मार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून सातत्याने अवजड कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत. या भल्या मोठ्या खड्ड्यात कंटेनर वाहन कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. याच परिसरात यापूर्वी दुचाकी तसेच एसटी बसला अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
अशाच प्रकारचे खड्डे नवघर उड्डाण पुलावरही पडले आहेत. या पुलावरून प्रवासी वाहने व विद्यार्थी प्रवास करीत आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून उरण परिसरातील पाऊस थांबला आहे. त्यामुळे रस्ते कोरडे झाले आहेत. द्रोणागिरी व उरण पनवेल मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेल्या खडीमुळे धूळ निर्माण होऊ लागल्याने प्रवासी आणि नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.
हे ही वाचा…नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा
उरण पनवेल मार्गावरील वाहनात प्रचंड वाढ झाली आहे. सातत्याने सुरू असलेल्या वाहनांमुळे पावसाळ्यात रस्त्याला झालेले खडे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी उखडून पडू लागली आहे. त्यातून धूळ तयार होत आहे. ही धूळ वाहनांमुळे वातावरणात पसरू लागली आहे. या धुळीमुळे समोरचे वाहन आणि व्यक्ती दिसत नाही. या परिसरात उघड्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या व वाहनचालकांच्या पोटात दररोज मूठभर धुरळा जात असल्याची शक्यता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा…नवी मुंबई : मतदार यादीतील दुबार नावे रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
तसेच त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या श्वसनाचे आजारही बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्गावरील ही धूळ कमी करण्यासाठी सिडको तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश घरत यांनी केली आहे.