पनवेल: मुंबई महानगरीतील मेट्रोचे परिचालन महामेट्रो ही कंपनी करते. महामेट्रोकडेच नवी मुंबई मेट्रोचे परिचालन करण्याचे काम सोपविले आहे. मात्र दोन्ही महानगरांमध्ये तिकीट भाड्यात मोठी तफावत ठेवली आहे. प्रवाशांना तब्बल दुप्पटीचे तिकीटभाडे देऊन नवी मुंबईतील मेट्रोचा प्रवास करावा लागत आहे. मुंबईत पहिल्या तीन किलोमीटरसाठी १० रुपये आणि तीन ते १२ किलोमीटर अंतराच्या मेट्रोप्रवासासाठी २० रुपये मोजावे लागतात. तर नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये आणि एक ते १० किलोमीटरचा प्रवास केल्यास ४० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मुंबईमेट्रो प्रमाणे नवी मुंबईकरांना किमान समान तिकीट भाडे आकारावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नवी मुंबई मेट्रोतून १० दिवसात लाखापार प्रवासी संख्या गेल्यानंतर सुद्धा प्रवाशांकडून तिकीट भाडे कमी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. महामेट्रो या कंपनीकडे मुंबई व नवी मुंबई मेट्रोचा कारभार चालविण्याचे काम दिले आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील तिकीटभाड्यात दुप्पटीची तफावत असल्याने लवकर तिकीटदर कमी करण्याची मागणी रास्त असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे. तळोजा वसाहतीमधील रहिवाशांना या मेट्रो सेवेचा सर्वाधिक लाभ होत आहे. वाहतूक कोंडीत न अडकता अवघ्या काही मिनिटांत प्रवाशांना वातानुकूलीत डब्यांमधून थेट तळोजा ते बेलापूर असा प्रवास करता येतो.
हेही वाचा… वाहन परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्याला अटक
मात्र या प्रवासाचे तिकीटदर कमी केल्यास अजूनही प्रवासी संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. सिडको मंडळाने दिवसाला तळोजा ते बेलापूर या पहिल्या टप्यातील मेट्रोमधून दिवसाला ९८ हजार प्रवासी लाभ घेतील असे अपेक्षित होते. यासाठी सिडको मंडळाने २९५४ कोटी १४ लाख रुपये खर्च करुन ही मेट्रो सेवा सूरु केली. आतापर्यंत १० दिवसात प्रतिदिन २० हजार प्रवासीसंख्या नोंदविली गेली. अजूनही नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेचे तळोजा ते बेलापूर तसेच खारघर या पल्यावर धावणा-या बससेवेचे प्रवासी कमी झालेले नाहीत. त्यामुळे सिडको मंडळाने ० ते १० किलोमीटरसाठी ४० रुपयांएेवजी २० रुपये भाडे आकारल्यास सिडको मंडळाच्या परिवहन विभागाने मांडलेले प्रवाशांचे गणित जुळेल असे बोलले जात आहे.
मेट्रोचे दर मुंबईप्रमाणे आकारावे अशी समस्त तळोजावासियांची मागणी आहे. आम्ही सिडको मंडळाचे वरिष्ठ अधिका-यांकडे ही सेवा सूरु झाल्यापासून मागणी करत आहोत. अजूनही अधिका-यांसोबत यावर बैठका सूरु आहेत. मात्र कोणतेही ठोस उत्तर न आल्याने आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत लेखी मागणी केली आहे. यामुळे मेट्रोचे प्रवासी वाढतील. आणि सर्वांचा प्रवास सूखकर होईल. गरीबांसाठी सिडको मंडळाने या परिसरात ५० हजारांहून अधिक घरे बांधलीत. या गरीब प्रवाशांना गारेगार मेट्रोचा प्रवास करण्याची संधी मिळणे त्यांचा हक्क आहे. – राजीव सिन्हा, सामाजिक कार्यकर्ता