टीम लोकसत्ता
नवी मुंबई: नवी मुंबई शहर निर्मितीचा टेंभा मिळवणाऱ्या सिडकोने नवी मुंबई शहरात लाखो घरांची निर्मिती केली आहे. आजही खासगी विकासकांच्या तुलनेत स्वस्तात हजारो घरे विक्रीसाठी सिडको काढत आहे. परंतु याच सिडकोने निर्माण केलेल्या घरांमध्ये पावसाळा सुरू होताच घरांच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे हजारो नागरीक सिडकोच्या घरांमध्ये जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे चित्र आहे.
सीवूडसह सर्वच विभागात सिडकोने लाखो घरांची निर्मिती करून सर्वसामान्यांना घरे विकली आहेत. परंतु सिडकोच्या घरांच्या बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न वारंवार समोर आलेला आहे.पावसाबरोबरच सिडकोनिर्मित घरांच्या छतांचे प्लास्टर पडण्याच्या घटनांचीही सुरुवात झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यावर्षी ५२४ धोकादायक इमारतीं असल्याची माहिती पालिकेने प्रसिध्द केली असून त्यामध्ये ६१ इमारती राहण्यास योग्य नसल्याचे जाहीर केले आहे. गेल्यावर्षी शहरात एकूण ५१४ धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली होती. यावर्षी ही संख्या वाढली असल्याचे दिसत असले तरी गेल्यावर्षी अतिधोकादायक असलेल्या काही इमारतींचे पुनर्विकासाचे काम सुरु झाल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-उरण: पिरवाडी किनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन
महापालिकेच्यावतीने दरवर्षी विभागवार सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्राील एकूण ५२४ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ नुसार धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ६१ इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ११४ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ३०० इमारती असून इमारतीची किरकोळ दुरूस्ती करण्यासारख्या असलेल्या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ४९ इमारती, अशाप्रकारे एकूण ५२४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.
शहरात पावसाला सुरवात झाली असून घरांच्या छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. रविवारी मध्यरात्री सीवूड सेक्टर ४८ येथील गायत्री सोसायटीतील ४१/३ या घरातील बेडरूमच्या छताचा मोठा भाग कोसळला सुदैवाने बेडरुममध्ये कोणीही न झोपता सर्वजन हॉलमध्ये झोपले होते. अशा अनेक घटना वारंवार होत असून सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत नागरिकांनी वारंवार आवाज उठवला असून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणून वारंवार दिंडोरा पेटणाऱ्या सिडकोच्या निकृष्ट बांधकामाचे चित्र वारंवार समोर येत आहे. अतिधोकादायक इमारत झालेली नसतानाही वारंवार घरांच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये सिडको विरोधात संताप आहे.
रात्री दोन वाजता गायत्री सोसायटीतील माझ्या घराच्या छताचा प्लास्टरचा मुख मोठा भाग कोसळला सुदैवाने त्या ठिकाणी झोपणारी माझी दोन्ही मुले बाहेर गेल्यामुळे दुर्घटना टळली. कमी कालावधीतच सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे इमारतींचे छताच्या प्लास्टरचे भाग कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे जीवित हानी झाल्यास कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. -शाहू बनसोडे ,गायत्री सोसायटी सदस्य