नवी मुंबई : सिडको मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ता संजय शिरसाट यांची नियुक्ती केल्यानंतर गुरुवारी शिरसाट हे पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्याचे समजल्यावर त्यांच्या समर्थकांनी बेलापूर येथील सिडको भवनासमोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदा फलकबाजी केली. तसेच नवी मुंबईतील विविध चौकांत फलकबाजी करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शिरसाट समर्थकांनी केला. पहिल्यांदा सिडकोच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा फलकबाजी सिडको भवनासमोर करण्यात आली असली तरी गुरुवारी नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक हातावर हात ठेऊन गप्प बसल्याचे चित्र होते.

बेलापूर येथे गुरुवारी सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष शिरसाट हे येणार असल्याने प्रत्येक दिशादर्शकांवर आणि झाडांना शिरसाट यांच्या अभिनंदनाचे फलक तारेने गच्च बांधण्यात आले होते. एकही झाड फलकांपासून सुटू नये यासाठी समर्थकांनी प्रत्येक झाडाला फलक लावले होते. याशिवाय महापालिकेने फलकासाठी उभारलेल्या कमानीवरसुद्धा शिरसाट यांच्या अभिनंदनाचा भव्य फलक झळकत होता. शहरांचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या सिडकोच्या अध्यक्षांसाठी झाडांना फलक लावल्यानंतर तारांनी झाडांना गुंडाळण्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. अध्यक्ष शिरसाट यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणार असल्याचे आश्वासन गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले होते. मात्र त्यांच्या समर्थकांनी पहिल्याच दिवशी सर्व नियम तोडून शहर विद्रूप करून उत्साह साजरा केल्याचे दिसले.

हेही वाचा >>>नवी मुंबई : कृत्रिम तलावाच्या ठिकाणी अपघाताची शक्यता

सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासह नैना शहर प्रकल्पासहीत महागृहनिर्माण योजना इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असेल- संजय शिरसाट, सिडको अध्यक्ष