नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाबाबत बैठकांवर बैठका होत असून अद्याप मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीतदेखील व्यापाऱ्यांची मागणी असलेल्या वाढीव जागेचा तिढा सुटलेला नाही. व्यापाऱ्यांनी पुनर्विकासात अधिकच्या एक हजार चौरस फूट जागेची मागणी केली आहे.
सन १९८२ मध्ये कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतीची बांधणी ही सिडकोनिर्मित असून २००५ पासून वर्षानुवर्षे धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. या बाजार समितीत एकूण २३४ गाळे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाची भिजत घोंगड्यासारखी गत झाली आहे. छताचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे या कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास होण्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्बांधणीबाबत बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र या बैठकांमध्ये देखील अद्याप प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात व्यापाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हा विषय रेंगाळत आहे.
हेही वाचा >>>पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजुरीसाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिघांना पकडले
या आराखड्यात तळमजला आणि पहिला मजला अशी ६५० चौरस फुटांची जागा व्यापाऱ्यांना देण्यात येत आहे. तसेच त्याचबरोबर पार्किंग सुविधा, अत्याधुनिक सुविधा देण्याचे नियोजन आहे. मात्र व्यापाऱ्यांना ६५० चौरस फूट जागेव्यतिरिक्त आणखी वाढीव एक हजार चौरस फुटांची जागा हवी आहे. त्यामुळे हा निर्णय होण्यास अडचणी येत आहेत.
हेही वाचा >>>पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा
वर्षानुवर्षे कांदा बटाटा बाजार धोकादायक होत चालला आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे देखील इमारती रिकाम्या करण्याच्या दृष्टीने कारवाई होत असते. त्यामुळे कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास करायचाच आहे असा निर्णय ठाम असून त्या दिशेने आम्ही पुढे चाललो आहोत. मात्र काही व्यापाऱ्यांची न्यायालयीन प्रकरणेदेखील आहेत, या सर्व प्रकरणांचा निपटारा करून कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे.- अशोक डक, काळजीवाहू सभापती, एपीएमसी