नवी मुंबई – मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा आणि मुलुंडदरम्यान जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परंतु, हार्बर मार्गावर मात्र रविवारी होत असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या हजारो श्री सदस्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील पूर्वनियोजित असलेला मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक होणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने लोकसत्ताला दिली.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात खारघर येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला जवळपास २० लाखांपर्यंत श्री सदस्य तसेच नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून लाखो नागरिक नवी मुंबई खारघर येथे रवाना होणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड, अलिबाग तसेच मुंबई शहर परिसरातून लाखो श्री सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रस्ते मार्गावरून प्रवास करताना सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लाखो भक्तगण रेल्वे मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावर होणारा पूर्वनियोजित असलेला मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून पनवेल स्टेशन मार्गे श्री सदस्यांना खारघर स्थानकापर्यंत पोहोचता येणार आहे. तसेच खारघर रेल्वे स्थानकापासून कार्यक्रम स्थळी जाता येणार आहे. तसेच मुंबई परिसरातील श्री सदस्यांना रेल्वे मार्गाचा वापर करून कार्यक्रम स्थळी पोहोचण्यास मदतच होणार.
हेही वाचा – नवी मुंबई : अमली पदार्थप्रकरणी विदेशी नागरिकास अटक, व्हिसाचीही मुदत संपलेली
हेही वाचा – राज्यात तब्बल ६२ हजार टन मासेमारी अवैध पद्धतीने, पर्ससीन पद्धतीचा सर्रास वापर सुरूच
मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रविवारी सुट्टीच्या दिवशी देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त नेहमी मेगाब्लॉक घेण्यात येतो. हार्बर मार्गावर रविवारी पूर्वनियोजित असलेला मेगाब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या रेल्वे प्रवासांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले.