नवी मुंबई : महायुतीचा आणि विशेषत: भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नवी मुंबई, उरण, पनवेल या शहरांमधील विधानसभेच्या चार जागांवर विजयाची पुनरावृत्ती करताना महायुतीतील घटक पक्षांचेच अंतर्गत आव्हान भाजपपुढे असेल असे चित्र ठसठशीतपणे दिसू लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन जागांपैकी एक जागा आम्हाला मिळावी, असा ठराव मंगळवारी सायंकाळी शिवसेना (शिंदे ) पक्षाच्या मेळाव्यात करण्यात आला. बेलापूर मतदारसंघात भाजपमध्ये विद्यामान आमदार मंदा म्हात्रे आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यातच उमेदवारीवरून कलगीतुरा रंगला आहे. तर उरणमध्ये महाविकास आघाडीतील शेकाप आणि शिवसेनेत उमेदवारीवरून जुंपली आहे.

हे ही वाचा…नवी मुंबई : वाशी खडीवरील तिसऱ्या पुलावरून आजपासू वाहतूक सुरू, टोलमुक्तीमुळे सततची वाहतूक कोंडी फुटली

लोकसभा निवडणुकीत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत महायुतीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. असे असले तरी कोकणपट्टीतील आणि विशेषत: मुंबई महानगर प्रदेशातील जागांवर मात्र महायुतीला चांगले यश मिळाले. ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर या चार लोकसभा मतदारसंघांपैकी तीन जागांवर महायुतीला विजय मिळला. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी सर्व विधानसभा क्षेत्रांत महायुतीचा उमेदवार आघाडीवर राहिला. असे असले तरी नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला तुलनेने कमी मताधिक्य मिळाले.

नवी मुंबईतील बेलापूर हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला होता. यामध्ये मंदा म्हात्रे यांच्या व्यक्तिगत करिष्म्यापेक्षा भाजपची असलेली लाट कारणीभूत ठरली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांपूर्वीही म्हात्रे यांचा ५० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय झाला. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला जेमतेम १२ हजारांचे मताधिक्य मिळाले.

हे ही वाचा…रेल्वेत कारकून पदभरती करतो असे सांगून सव्वाकोटी रुपयांची २० जणांची फसवणूक

ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीला नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. महायुतीचा गड समजल्या जाणाऱ्या या शहरात तुलनेने हे मताधिक्य घटलेले दिसून आले. त्यामुळे आगामी विधासनसभा निवडणुकीत येथील लढती रंगतदार होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी संदीप यांनी आपल्या निकटवर्तीयांची एक बैठक घेत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बेलापूर मतदारसंघात भाजपला अंतर्गत दुहीचा सामना करावा लागेल असे चित्र आहे. ऐरोलीतही शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौघुले यांनी गणेश नाईक यांना मदत करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

हे ही वाचा…बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून पतीच्या जमिनीवर परस्पर कर्ज

महायुतीत टोकाचे मतभेद

नवी मुंबईत भाजपचे नेते गणेश नाईक आणि शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये विळा-भोपळ्याचे नाते आहे. कोणत्याही परिस्थितीत नाईक यांना मदत करणार नाही अशी भूमिका शिंदे सेनेचे स्थानिक नेते आतापासूनच घेताना दिसत आहेत. शिंदे सेनेचे नेते विजय नाहटा यांनी मध्यंतरी आपण तुतारी हाती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी ‘आवाज’ देताच नाहटा यांचे बंड सध्या थंडावल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शिंदे सेनेतील एकही प्रभावी पदाधिकारी नाहटा यांच्याबरोबर जाण्यास तयार नसल्याने त्यांची अडचण झाल्याचे समजते. दरम्यान, बेलापूर मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उमेदवारीवर दावा केल्याने पक्षात जोरदार संघर्ष सुरू झाला असून विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is picture that bjp will have to face internal conflict in belapur constituency sud 02