नवी मुंबई : नेरुळ सेक्टर एक मध्ये रस्त्याच्या कडेच्या पदपथावर टाकलेल्या एका पोत्यातून रक्ताचे ओघळ येत असल्याने खळबळ उडाली होती. हि बाब वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी झाली. नेरुळ पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी ते पोते उघडून पाहिले असता आत कोंबडीची मांस व  पिसे आढळून आली. या बाबत घनकचरा विभागाला कळवताच  त्यांनीही धाव घेत हा कचरा घेऊन गेले. या बाबत तपास आता घनकचरा करीत आहे. 

सोमवारी दुपारच्या वेळी नेरुळ सेक्टर १ येथे पदपथावर एक बांधून ठेवलेल्या  पोत्यातून रक्ताचे मोठ्या प्रमाणात ओघळ आलेले दिसत होते. बघता बघता याची कुजबुज परिसरात सुरु झाली आणि नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यास गर्दी जमू लागली. या बाबत नेरुळ पोलिसांना माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. सुरवातीला एखाद्याची हत्या केली असावी असाही संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी पोते  उघडून पाहिले असता त्यात कोंबडीचे पीस आणि मांस  आढळून आले. या बाबत त्यांनी घनकचरा विभागाला कळवले. त्यांनी हे कोंबडीचे मांस  असल्याची खात्री करून विल्लेवाट लावण्यासाठी घेऊन गेले. 

या बाबत  घनकचरा व्यवस्थापक बाळासाहेब राजळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि एखाद्या  चिकन सेंटर चालकाने हे कृत्य केले असावे. हा गुन्हा असून त्याला दंडही आहे. चिकन सेक्टर मध्ये कोंबडी कापल्यावर राहिलेला कचरा (वेस्ट) आणि फ्रिजर मध्ये ठेवलेले थोडे मांस पोत्या मध्ये भरून टाकून दिले होते. परिसरातील सीसीटीव्ही पाहून समंधीत व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

Story img Loader