लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल: राज्यातील अमृत शहरांमध्ये माझी वसुंधरा ३.० अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरात पनवेल महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला असून राज्य सरकारतर्फे पनवेल पालिकेच्या प्रशासनाला ५ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. २०१६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील २७ वी महापालिका म्हणून पनवेल महापालिकेची स्थापना करण्यात आली. वय कमी असले तरी या शहरातील नागरिक, स्वच्छता दूत, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या प्रशासनातील अधिका-यांची कार्यक्षमता यामुळे हा मान मिळाल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.

राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत ३ ते १० लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये पनवेल महानगर पालिकेने तिसरा क्रमांक पटकावला.

आणखी वाचा-बुधवारी नवी मुंबईत दिवसभर पाणी पुरवठा बंद

सोमवारी मुंबई येथील नरीमन पॉईंट परिसरातील जमशेद भाभा थिएटरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझी वसुंधरा ३.० सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व अधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी आयुक्त देशमुख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ, उपायुक्त कैलास गावडे, विठ्ठल डाके, गणेश शेटे, प्रकल्प कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने केलेल्या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने दखल घेतली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third rank in the state in the panvel municipal corporations majhi vasundhara campaign mrj