रविवारी उरणच्या वायू विद्युत केंद्रात झालेल्या भीषण स्फोटातील कुंदन पाटील या तिसऱ्या जखमी कामगाराचाही मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वायू विद्युत केंद्रात ४० वर्षात पहिल्यांदा घडलेला हा सर्वात मोठा अपघात आहे. या स्फोटात एकाच वेळी तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या वायू विद्युत केंद्रात मागील चार वर्षांपासून सुरक्षा अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २००९ मध्ये झालेल्या केंद्रातील दुर्घटनेत एका स्थानिक कामगाराचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा- नवी मुंबई शहराचे लँडमार्क वंडर्स पार्क लवकरच खुले होणार; नव्या खेळण्यांसह देखण्या पार्कचे मेकओव्हर
हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
रविवारच्या दुर्घटनेत वायू विद्युत केंद्रातील कनिष्ठ अभियंता विवेक धुमाळे,तंत्रज्ञ कुंदन पाटील व सहाय्यक कंत्राटी कामगार विष्णू पाटील हे तीन कामगार वाफ आणि उकळते पाणी वाहणारी वाहिनी फुटल्याने गंभीररीत्या होरपळले होते. यातील कनिष्ठ अभियंता विवेक धुमाळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर कंत्राटी कामगार विष्णू पाटील यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या दुर्घटनेतील जखमी झालेले तिसरे कर्मचारी तंत्रज्ञ कुंदन पाटील यांच्यावर नवी मुंबईतील ऐरोलीच्या बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे उरणमधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची ही मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली जात आहे.