नवी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नवी मुंबई तिरंगामय झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले. आज ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो देशप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
दिघा येथील तलावाजवळून सकाळी या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी दिघा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी तिरंग्यासोबत सेल्फी घेतली. हजारो नागरिक या बाईक रॅलीमध्ये शिस्तीने सहभागी झाले होते. खास करून युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्वच घटक भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा देत होते. सर्वांच्या हातात, बाईकवर, वाहनांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता.
हेही वाचा – ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी नवी मुंबई महापालिकेकडून १५ रुपयांत काठीसह तिरंगा मिळणार
तिरंगा बाईक रॅलीदरम्यान पावसानेही हजेरी लावली. दिघा येथून सुरू झालेली ही बाईक रॅली ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध भागांत मार्गस्थ होताना तिरंगा बाईक रॅलीचे सर्वच ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा बाईक रॅलीची सांगता झाली. आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.
हेही वाचा – नवी मुंबई : मोबाईल चोरी करणारे ३ जेरबंद, १३ लाख ६७ हजार रुपयांचे मोबाईल जप्त
गेल्या वर्षी देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावर्षी या महोत्सवाचा सांगता समारंभ सर्वत्र साजरा होतो आहे. प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल अभिमान आहेच. हा अभिमान वृद्धिंगत होऊन मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासानुसार देश जेव्हा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल त्यावेळेस भारत जगाचे नेतृत्व करेल असा उत्साह पाहायला मिळाला. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरांवर ,कार्यालयांवर, सर्वच ठिकाणी ध्वज संहितेचे पालन करून सन्मानाने तिरंगा ध्वज फडकवावा. आपल्या सर्वांच्या मनामध्ये तिरंग्याबद्दल मान, सन्मान आणि अभिमान आहेच. भविष्यकाळात भारत जगाला सुरक्षितता आणि निर्भयता प्रदान करेल अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली.